‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन सुरु असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांदरम्यान शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपाला लक्ष्य केलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचाही संदर्भ देताना, “उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत” असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीला दोषी ठरवत अकलेची दिवाळखोरी जाहीर केल्याचा घणाघात शिवसेनेनं केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही उल्लेख केला आहे.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणतात, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर…”

“महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. तरीही ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. पुण्याच्या तळेगावजवळ ११०० एकर जमीन व इतर सवलती या उद्योगास देण्याचे महाविकास आघाडी सरकारने मान्यच केले होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे कंपनीचे पक्के वचन होते. जूनपर्यंत तरी कंपनीचे मन बदलले नव्हते, पण महाराष्ट्रात एक बेकायदा सरकार विराजमान होताच किमान एक लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे,” असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

“महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर हा खूप मोठा हल्ला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा नुकताच पैठण दौरा झाला. त्यांच्या गटाचे आमदार भुमरे यांचा हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री पैठण यात्रेस गेले. तेथे एका मंडपात मुख्यमंत्र्यांची पेढे व लाडवांची तुला करण्याची योजना होती. त्यासाठी अनेक खोके भरून मिठाई तेथे आणली होती. शिंदे गटाचा खोक्यांशी संबंध जोडला जात असला तरी खोक्यातली मिठाई पाहून ‘तुला’ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी नाकारले. त्यांनी मिठाईतुला नाकारताच त्या मांडवात जमलेल्या लोकांनी लाडू-पेढय़ांची अक्षरशः लूटमार केली. लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर लाडू-पेढे पळवून नेले. अगदी त्याच ‘लूटमार’ पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प पळवून नेला आहे,” अशी तुलना शिवसेनेनं केली आहे.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर

“याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले. आता फॉक्सकॉन हातचे गेले. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. मग दोन वर्षे काय फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते? इतक्या मोठ्या प्रकल्पाविषयी दिरंगाई होत आहे याविषयी त्यांनी तोंडातून ‘ब्र’ काढल्याची नोंद कोणत्याही कॅबिनेट बैठकीत नाही. आमचा तर आरोप नव्हे, तर खात्रीच आहे. फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात वाद; PM मोदी म्हणाले, “हा करार…”

“‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपावालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे,” असा इशाराही शिवसेनेनं मनसेला दिला आहे.

“मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपाने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले. अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे. वेदान्त-फॉक्सकॉनसारखे प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातून खेचून नेले जात असताना मुख्यमंत्री दाढीची खुंटं उपटत बसल्यानेच मराठी माणसाचे नुकसान झाले आहे. शिवसेनेवर खापर फोडणाऱ्यांनी मुळात हा विचार केला पाहिजे की, जर शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

“माणसं एकदा बेइमानीच्या उताराला लागली की त्यांना सावरणे कठीण असते. मुख्यमंत्री शिंदे यांची गाडी त्याच बेइमानीच्या उताराला लागली आहे. त्यांचा अधःपात आता अटळ आहे. सुरत व गुवाहाटी येथे बेइमान आमदार गटास शिंदे सांगत होते, ‘‘घाबरू नका. आपल्यापाठी एक महाशक्ती आहे. आता आपल्याला हवे ते मिळेल!’’ शाब्बास शिंदे! तुम्हाला हवे ते मिळाले; पण महाराष्ट्रातील लाखभर तरुणांच्या तोंडचा घास आणि रोजगार मात्र तुमच्या त्या बकासुरी महाशक्तीने ओरबाडून नेला. त्याचे खापर आधीच्या सरकारवर फोडून तुम्ही तुमच्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ‘वेदान्त’च्या मालकांची पोस्ट शेअर करत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन लाख कोटी रुपयांची…”

“उद्या हे महाराष्ट्रातील जनावरांत पसरत असलेल्या ‘लम्पी’ आजाराचे खापरही आघाडी सरकारवर फोडतील. स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी हलतोय त्यांच्या नावाने बोटे मोडायची किंवा जादूटोणा करायचा अशा वृत्तीची अवलाद महाराष्ट्राच्या नशिबी यावी हे दुर्भाग्य नाही तर काय? आज एक लाख नोकऱ्या देणारा वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प या लोकांनी दुसऱ्या राज्यात जाऊ दिला. पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने कसोशीने पाठपुरावा केलेला ‘बल्क ड्रग पार्क’ हा आणखी एक मोठा प्रकल्पही महाराष्ट्राने गमावला आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला हा प्रकल्प आता गुजरातसह आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे. आणखी असे किती उद्योग महाराष्ट्रातून इतर राज्यांत जातील हे सध्याचे ‘ईडी’ सरकार आणि त्यांच्या त्या ‘महाशक्ती’लाच माहीत. त्यांच्या मनात आणखी काय काय सुरू आहे ते एखाद्या अघोरी बाबा-बुवालाच माहीत. कारण हिंदूंचे देव आणि संत या सरकारला कदापि आशीर्वाद देणार नाहीत,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“‘वेदान्त-फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा आहे. त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे. शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे. महाराष्ट्राने डोळे उघडे ठेवून पावले टाकायला हवीत,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.