सातारा : आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची परिस्थिती असताना घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठी झळ समाजाला बसत आहे. स्वयंपाकघरातून बाहेर पडणारा दैनंदिन कचरा घंटागाडीत न टाकता तो बायोगॅसच्या युनिटमध्ये टाकून त्यातून गॅस निर्मिती करण्याचा अनोखा प्रयोग सातारच्या राजघराण्यातील स्नुषा व ‘कर्तव्य सोशल ग्रुप’च्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी आपल्या निवासस्थानी केला आहे. घरातील कचऱ्यातून तयार होणारा हा गॅस कुटुंबाची दैनंदिन गरज भागविण्यासाठी महत्त्वाचा आणि कमी खर्चिक, तसेच शाश्वत जीवनशैलीकडे घेऊन जाणारा पर्याय ठरत आहे.
विशेषतः आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता सामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. लांबच लांब रांगा आणि केवळ प्रतीक्षा करणाऱ्या अनेकांसाठी राजघराण्यातील हे शाश्वत पाऊल महत्त्वपूर्ण आणि अनुकरणीय असे ठरले आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी गेल्या १२ वर्षांपासून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. घरातील किचन वेस्टपासून (ओल्या कचऱ्यापासून) बायोगॅस निर्मिती केली. त्यांच्या कुटुंबाचा स्वयंपाक त्यावरच होतो. केवळ छंद म्हणून नाही, तर सातत्य राखून त्यांनी पर्यावरणाप्रति जबाबदारी पार पाडली आहे.
राजघराणे असल्याने आमच्या घरी नियमितपणे मोठी गर्दी असते आणि शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात असल्यानंतर आम्हाला दररोज किमान ५०० ते ७०० कप चहा लागतो. या व्यवस्थेसह घरातील स्वयंपाकघरातही आमच्याकडे हाच गॅस वापरला जातो.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. पूर्वीच्या काळी अनेकांनी घरोघरी गोबरगॅस उभारले होते. मात्र, नंतरच्या सुटसुटीत जीवनासाठी व मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील गोबरगॅस काढून टाकण्यात आले. त्याची गरज आता घरगुती गॅसवापराचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा उपस्थित झाली आहे. ज्यांच्याकडे पशुधन आणि अशी व्यवस्था उपलब्ध आहे, त्यांनी स्वतःची व्यवस्था उभी करायला हवी, अशी अपेक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केली.
स्मार्ट फोन परवडणाऱ्यांना नक्कीच शक्य
बंगल्यामध्ये राहणाऱ्या किंवा अपार्टमेंटमध्ये एकत्र येऊन या पद्धतीने बायोगॅसचे युनिट उभे करणे सहजशक्य आहे. चार जणांच्या ज्या कुटुंबाला हातात स्मार्ट फोन घेणे परवडते त्या प्रत्येक कुटुंबाला बायोगॅस युनिट बसवणे शक्य आहे. बंगल्याभोवती थोडी जागा असेल, तर तिथे स्वयंपाकघरातील कचरा आणि ह्युमन वेस्ट यांच्या एकत्रीकरणातून किमान चार जणांच्या कुटुंबाला पुरेल इतका गॅस तयार होतो.
गोबरगॅस विस्मृतीत
ग्रामीण भागामध्ये गोबर गॅस हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहिला होता. गोठ्यामध्ये असलेल्या गाई-म्हशींच्या शेणापासून तयार झालेला हा गॅस ग्रामीण भागातील महिलांच्या डोळ्यांतील पाणी पुसणारा ठरला होता. आता मात्र पाळीव जनावरे नसल्याने अथवा कमी झाल्याने गोबरगॅस लोकांच्या विस्मृतीत गेला. शासनाच्या उज्ज्वला योजनेंतर्गत घराघरांमध्ये गॅस पोहोचल्यामुळे गोबरगॅस शेगडी आता अनेकांच्या विस्मृतीत गेली आहे.
माझ्या माहेरी आणि सासरीही गोबर गॅस उपलब्ध आहे. मोठे महाराज (अभयसिंहराजे) यांनी शेतात आणि या घरी ही यंत्रणा उपलब्ध केली आहे. शिवेंद्रसिंहराजेही शेतकरी आहेत आणि त्यांनी आजही यंत्रणा कायम ठेवली आहे. निसर्गात उपलब्ध संसाधने सर्वांसाठी समानच आहेत. राजघराण्याचे ज्या हक्काने नाव सांगतो त्यातूनच आलेल्या कर्तव्यभावनेतून निसर्गाचे पुन्हा निसर्गाला देण्याची वृत्ती जपली आहे. आमच्या या पर्यावरणपूरक संवेदनशीलतेचेही अनुकरण व्हावे. – वेदांतिकाराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष, कर्तव्य सोशल ग्रुप
