मुंबई – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा तत्काळ फोटो काढून त्यांना ई-चलन पाठविले जाते. मात्र बऱ्याचदा वाहनधारकांकडून हे ई – चलन भरले जात नाही. याची वसुली करून महसुलात वाढ करण्यासाठी गृह विभागाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. आता अशा वाहनधारकांचा मागोवा घेतला जाणार असून त्यांना कठोर शिक्षा करण्याबाबत आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांना धमकावून त्यांना दंड ठोठावणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात येणार असून यासाठी सरकारकडून अभ्यासगट नेमण्यात आला आहे.
राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर ई-चलन आकरण्यासाठी वाहतूक पोलिसांना विशिष्ट प्रकारचे फोटो काढणारे मशीन देण्यात आले आहे. या मशीनद्वारे फोटो काढल्यानंतर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र वाहनचालकांकडून या कारवाईकडे दुर्लक्ष करून ईचलान वर्षानुवर्षे भरलेच जात नाही. त्याचप्रमाणे सुनावणीची नोटीस पाठविल्यानंतर त्यालाही दाद दिली जात नाही. यावर उपाय म्हणून सरकारकडून परदेशात कशाप्रकारे ईचलन वापरले जाते आणि त्याची वसुलीही कशाप्रकारे केली जाते याचा अभ्यास केला जात आहे.
वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करुन त्या व्यक्तीचा मागोवा घेतला जाणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा केली जणार आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांतील किंवा राज्यांत याबाबत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महसूलवाढीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ई-चलनाचा पोलिसांमार्फत गैरवापार होणार नाही याचा देखील अभ्यास करण्यात येईल, याकरिता गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आला आहे.
यात गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष), माहिती तंत्र ज्ञान विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), परिवहन आयुक्त, पोलीस सह आयुक्त (वाहतूक) या अभ्यास गटाचे सदस्य असणार आहेत, तर गृह विभागाचे सह सचिव किंवा उप सचिव या अभ्यास गटाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
