सावंतवाडी : “आंबा-काजू नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे”, “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देत वेंगुर्ला तालुक्यातील आंबा-काजू बागायतदारांनी आज प्रशासनाचे लक्ष वेधले. वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना आणि बागायतदारांच्या वतीने वेंगुर्ला बसस्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. ६ मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हवामानातील बदलामुळे यंदा आंबा आणि काजू पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बागायतदारांनी एकत्र येत हा मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केल्यानंतर तहसीलदार ओंकार ओतारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बागायतदारांनी मागण्यांचे निवेदन दिले. या मध्ये क्षेत्र मर्यादेचा निकष काढून टाकून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळावी.
काजू पिकासाठी प्रति हेक्टरी ३ लाख रुपये भरपाई जाहीर करावी.पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.हवामानातील बदलामुळे बाधित झालेल्या सर्व बागायतदारांना तातडीने न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, सचिव स्वप्निल शिरोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव एम. के. गावडे, बागायतदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर, माजी सभापती यशवंत ऊर्फ बाळू परब, प्रफुल्लचंद्र परब, माजी नगरसेवक नागेश गावडे, आडेली जि. प. सदस्य विजय नाईक, नगरसेवक प्रीतम सावंत, संदेश निकम, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, भाजपा युवा मोर्चाचे हितेश धुरी, भूषण आंगचेकर, समीर कुडाळकर, विजय रेडकर, बाबुराव परब, अवी दुतोंडकर, बंड्या पाटील, शैलेश परुळेकर, रमण वायंगणकर, संतोष गाडगीळ यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील हजारो शेतकरी व बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या १२ मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

