सावंतवाडी: वेंगुर्ले तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर संमिश्र निकाल पाहायला मिळाले असून, पंचायत समितीवर मात्र महायुतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. जिल्हा परिषदेत उद्धवसेनेने दोन जागांवर बाजी मारली असली, तरी पंचायत समितीमध्ये त्यांना खातेही उघडता आले नाही.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला (भाजप-शिंदेसेना) अपेक्षित यश मिळाले नाही. तालुक्यातील ५ जागांपैकी उद्धवसेनेला २, तर शिंदेसेना, भाजप आणि अपक्ष यांना प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.
उद्धवसेना: उभादांडा गटातून संजय गावडे यांनी १४६१ मताधिक्यांनी विजय मिळवला.
अपक्ष: तुळस गटात महायुतीच्या बंडखोर उमेदवार सुजाता पडवळ विजयी झाल्या.
महायुती: रेडी गटातून माजी सभापती प्रितेश राऊळ पुन्हा निवडून आले.
पराभूत दिग्गज: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, माजी सदस्य योगिता परब आणि माजी सभापती वंदना किनळेकर या अनुभवी नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.
पंचायत समिती: महायुतीची एकतर्फी सत्ता
पंचायत समितीमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण १० जागांपैकी भाजप पुरस्कृत ६, शिंदेसेनेचे ३ आणि अपक्ष १ अशा बलाबलानुसार महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
विजयी उमेदवार: विष्णू फणसेकर (भाजप), सचिन देसाई (शिंदेसेना), नितीन मांजरेकर (भाजप पुरस्कृत), शितल राऊत (भाजप), सुचिता वजराठकर, शंकर घारे (भाजप), साक्षी नार्वेकर (शिंदेसेना), संकेत धुरी (भाजप – बिनविरोध), प्रियांका घाटवळ (भाजप) आणि योगिता परब-मसुरकर.
विशेष नोंद: शिरोडा गणात एकही मत ‘नोटा’ला पडले नाही. तसेच आसोली गणात भाजपाचे संकेत धुरी यांची बिनविरोध निवड झाली.
पराभूत: माजी सभापती निलेश सामंत यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विजयाचा जल्लोष
निकाल जाहीर होताच महायुती आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष केला. डीजेच्या तालावर मिरवणुका काढून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेत उद्धवसेनेने शिरकाव केला असला तरी, तालुक्याच्या सत्तेत (पंचायत समिती) महायुतीने आपली पकड घट्ट केली आहे.
