वेरुळ शस्त्रसाठय़ातील आरोपी शेख अब्दुल नईम अब्दुल करीम हा राजस्थानातील रायगड येथून पळून गेला असल्याची दहशतवाद विरोधी पथकाने सांगितलेली माहिती पूर्णत: चुकीची आहे. त्याला ‘एन्काऊंटर’ करून मारले असावे किंवा पथकाने अवैधरीत्या दडवून ठेवले असावे, असा आरोप नईम अब्दुल करीमच्या आईने केला.
आरोपी नईमवर वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत. यातील पहिल्या प्रकरणात नईमला औरंगाबादेत पकडले. मात्र, पश्चिम बंगालमधील बोनगाव येथे त्याला अटक केल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत. त्याला ३ दिवस अवैध पद्धतीने डांबून ठेवले. त्यानंतर २५ दिवस पोलीस कोठडी दिली. त्यावेळी त्याच्या नार्को, ब्रेन मॅपिंग व लाय डिटेक्टर या चाचण्या झाल्या. या प्रकरणात सुटका होऊ नये, म्हणून त्याच्यावर अन्य बनावट गुन्हे लादले गेल्याचा आरोप नईमचा भाऊ डॉ. शेख फईम यांनी केला. बहुतांश प्रकरणात नईमला निर्दोषत्व सिद्ध करण्यापर्यंत साक्षीपुरावे झाले होते. तीन महिन्यांत अन्य एका प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे त्याला लवकर सुटका होईल, असे वाटत होते.
दोन गुन्ह्य़ांतून सुटका झाल्यानंतर तिसऱ्या गुन्ह्य़ातही नईमला जामीन देण्यात आला. अन्य दोन गुन्ह्य़ांत तीन महिन्यांत निकाल द्यावा, असा उच्च न्यायालयाचा आदेश होता. नईम मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त व अशक्तही झाला आहे. अनेक वेळा त्याच्याबरोबर केवळ २ पोलिसांचे संरक्षण होते. तो पळून गेला असे सांगितले जाते, तेव्हा त्याच्याबरोबर ५ पोलीस होते. यातील २ शस्त्रधारी होते, तरीही तो पळून गेला हे सांगणे चुकीचे असल्याचा दावा डॉ. फईम यांनी केला.
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. तपास बंगाल, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जाऊ नये, अशी मागणीही पत्रकार बैठकीत त्यांनी केली. नईमच्या आईने माझा मुलगा निर्दोष आहे. एवढे दिवस त्याने निर्दोषत्व मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्यामुळे अगदी शेवटी तो पळून जाणार नाही. त्याला मारले असावे किंवा त्याला अवैधरीत्या डांबून ठेवले असावे. जेणेकरून दुसऱ्या एखाद्या प्रकरणात त्याला गोवता येईल, असा दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांचा होरा असल्याचा आरोपही नईमच्या आईने केला.