scorecardresearch

Premium

सोलापूरच्या उजनी जलाशयात प्रथमच दुर्मीळ बीनहंस पक्षी दाखल

सोलापूरमधील पक्षांचं नंदनवन ठरलेल्या उजनी जलाशयात यावर्षी प्रथमच युरोपातून हिवाळी पाहुणा म्हणून बीनहंस पक्षी येऊन दाखल झाला आहे.

सोलापूरच्या उजनी जलाशयात प्रथमच दुर्मीळ बीनहंस पक्षी दाखल

सोलापूरमधील पक्षांचं नंदनवन ठरलेल्या उजनी जलाशयात यावर्षी प्रथमच युरोपातून हिवाळी पाहुणा म्हणून बीनहंस पक्षी येऊन दाखल झाला आहे. अकलूज येथील पक्षी निरीक्षक ऋतुराज कुंभार व दिग्विजय देशमुख या वन्यजीव छायाचित्रकारांनी नुकतेच आपल्या कॅमेऱ्यात या बीनहंसाची छबी कैद केली आहे. हंस गणातील कलहंस हे यापूर्वी या ठिकाणी अनेक वेळा आल्याची नोंद आहे. मात्र बीन हंस पक्षी, उजनी निर्मितीनंतर पहिल्यांदाच आला आहे. तो सध्या भिगवणच्या जवळपास पसरलेल्या विस्तीर्ण पाणफुगवट्यावरील उथळ पाण्याच्या ठिकाणी पट्टकदंब हंसांच्या थव्यात विहार करताना दिसतो.

बीनहंस पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात दाखल

दरवर्षी हिवाळ्यात रशियाजवळच्या युरेशिया, सायबेरिया मंगोलिया येथून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी व अन्य स्थलांतरित पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होतात. पुढे ३-४ महिने विविध राज्यांमधील जलस्थानांवर वास्तव्य करून पुन्हा आपल्या मूळ प्रदेशाकडे निघून जातात. या पक्षांच्या संगतीने युरोपातील ब्रिटन, नार्वे, कॅनडा येथील बर्फाच्छादित प्रदेशातील काही टुन्ड्रा व टायगा हंसपक्षी भरकटत भारतात येतात. त्यातलाच हा प्रकार म्हणजे यावेळी उजनीवर बीन हंस येऊन दाखल झालेला आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
devendra fadnavis (1)
“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

हंसपक्षी स्थानिक बदकांपेक्षा आकाराने मोठा

इंग्रजीत बीनगूज म्हणून ओळखला जाणारा हा हंसपक्षी स्थानिक बदकांपेक्षा आकाराने मोठा आहे. त्याचे डोके गोलाकार आहे. चोच जड व गडद तपकिरी रंगाची आहे. त्यावर मध्यभागी नारंगी डाग दिसून येतो. त्याचे पाय नारंगी रंगाचे असून पायांची बोटे पातळ पापुद्र्यांनी जोडलेली असतात. पंख गडद तपकिरी पिसांचे असतात. हा हंसपक्षी पूर्णपणे शाकाहारी असून तो पाणवनस्पतीचे खोड व पाणथळ जवळच्या पिकांची पाने, बिया या खाद्यांवर गुजराण करतो.

सुमारे पंचवीस वर्षे आयुर्मान लाभलेला हा हंस सामान्यपणे अडीच ते तीन किलो वजनाचा असतो. उजनीवर कधीकधी भरकटत येणाऱ्या कलहंस व बीनहंस यामध्ये बरेच साम्य असते.

बीनहंसाचे वैशिष्ट्ये

  • युरोपातील नार्वे व ब्रिटनपासून रशियाच्या युरेशिया भागातील टुंड्रा व टायगा प्रदेशात हे हंस वीण घालतात म्हणून यांना टुंड्रा बीनगूज या नावाने ओळखतात.
  • पाणवठ्यालगतच्या असलेल्या पावटा व वाटाणासारख्या पिकांत यांचा वावर असतो. म्हणून बीनहंस हे नाव दिले आहे.
  • हिंदू धर्मात हंसांना मानाचे स्थान आहे. हंस सरस्वतीचे वाहन आहे. हंसाची हत्या करणे म्हणजे माता-पिता, देवता व गुरूची हत्या करणे असे समजले जाते. पाणी व दूध अलग करणारा हा पक्षी आहे अशीही अख्यायिका सांगितली जाते.

दुर्मीळ हंस उजनीवर पहिल्यांदा आल्याने पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करत आहेत. त्याचे छायाचित्र टिपताना व निरीक्षण करताना पर्यटकांनी भरकटत आलेल्या या हंस पक्षाला असह्य होईल असे वर्तन करू नये असे, आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.

हेही वाचा : सोलापुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यात भरली निसर्गशाळा, पक्षी निरीक्षणात रमले लहानगे

अकलूजचे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, “उत्तर युरोपातील ब्रिटन व नार्वे या शीत प्रदेशात वीण घालणारे हे हंस दरवर्षी रशिया जवळच्या मंगोलिया, सायबेरिया व युरेशिया व उत्तर एशियातील चीनपर्यंत स्थलांतर करून येत असतात. हे पक्षी भारतात तसे येणे दुर्मिळच. मंगोलिया व सायबेरिया येथे मूळ वास्तव्याला असणारे पट्टकदंब हंस, चक्रवाक, धोबी, पाणटिवळे इत्यादी दरवर्षी हिवाळ्यात उजनी परिसरात स्थलांतर करून येतात. भारतात येणाऱ्या या हिवाळी स्थलांतरितांसोबत हा बीनहंस भरकटत आला असावा.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Very rare bean goose birds came to ujani water in solapur from europe pbs

First published on: 04-01-2022 at 00:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×