लोकसंख्या व उत्पन्नाच्या निकषाच्या कसोटीस उतरणाऱ्या बोईसर ग्रामपंचायतीला लवकरच नगरपालिकेचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी बोईसर येथे केली. मात्र ठाणे जिल्हा विभाजनाच्या घोषणेबाबत त्यांनी मौन बाळगल्याने जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने बोईसर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यात काही जिल्ह्य़ांचे विभाजन केले जाणार असून त्यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्याला अग्रक्रम दिला जाईल, असे सांगत त्यांनी जिल्हा विभाजनावर अधिक भाष्य करणे टाळले. बोईसर ग्रामपंचायत नगरपालिका होण्याचे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने प्रस्ताव येताच, तिला नगरपालिकेचा दर्जा देण्यास कोणतीच अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आघाडी सरकार आदिवासी तसेच गोरगरीब जनतेसाठी विशेष कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. वनहक्कदाव्यामधील ९२ टक्के लाभार्थ्यांना वनपट्टय़ांचे वाटप केले असून, पट्टे वाटपामध्ये महाराष्ट्र अन्य राज्यांपेक्षा आघाडीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देता आल्याचे समाधान आहे, असेही ते म्हणाले.
या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे , आदिवासी विकास राजमंत्री राजेंद्र गावित यांच्यासह जिल्ह्य़ातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.