Sculptor Ram Sutar Passes Away: भारतातील नामवंत आणि जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. नोएडा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. राम सुतार यांनी २०० हून अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली.
राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारला. या पुतळ्याचे वजन १७०० टन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या पुतळ्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ते पंतप्रधान असताना स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
राम सुतार यांचा जीवन परिचय…
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला होता. त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.
राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्य होते.
जिवंत मूर्ती साकारणारा उमदा कलाकार हरपला – मुख्यमंत्री
ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांचे सांत्वन केले, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ‘महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो, अशी आठवणही मुख्यमंत्री कार्यालयातर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
शिल्पकलेचा कोहिनूर गमावला – उपमुख्यमंत्री शिंदे
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
