Veteran writer Prabha Ganorkar criticizes government intervention in literature sector during Inauguration of the Comprehensive Literary Conference in nagpur | Loksatta

‘सरकारला साहित्यिकांची भीती म्हणूनच त्यांनी द्वादशीवारांना डावलले’; प्रभा गणोरकर यांची साहित्य क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेपावरुन टीका

‘पाचवे ऐसी अक्षरे रसिके’ या सर्वसमावेशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी गणोरकर यांनी साहित्य क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेपावर टीका

‘सरकारला साहित्यिकांची भीती म्हणूनच त्यांनी द्वादशीवारांना डावलले’; प्रभा गणोरकर यांची साहित्य क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेपावरुन टीका
पाचवे ऐसी अक्षरे रसिके' या सर्वसमावेशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

राज्यकर्त्यांना सर्वात जास्त भीती असते ती लेखकांची. ते लिहितात, असा संशय जरी आला तरी लिहिण्यावर बंधणे घातली जातात. त्यांनी व्यासपीठावर उभे राहून बोलू नये, यासाठी राजकारण केले जाते. हे राजकारण किती घाणेरडे असते हे सुरेश द्वादशीवारांच्या उदाहरणावरुन स्पष्ट झाले आहे, अशा परखड शब्दात ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांनी साहित्य क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेपावर टीका केली.

हेही वाचा- ठरलं, नागपुरात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट; दीक्षाभूमी, शांतीवन, ड्रॅगन पॅलेस आणि…

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्यावतीने श्रीमती सुगंधाबाई शेंडे व प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित ‘पाचवे ऐसी अक्षरे रसिके’ या सर्वसमावेशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गणोरकर म्हणाल्या, द्वादशीवार बोलणारा माणूस आहे. तो कोणतीही दडपशाही सहन न करणारा आहे. त्यामुळे असा माणूस बाजूला ठेवलेला बरा आणि व्यासपीठावर न आलेला बरा असा विचार करून नुकतेच राजकारण करण्यात आले. परंतु, जो लेखक अस्सल असतो तो लिहितोच, त्याची अस्वस्थता त्याला लिहिण्यास भाग पाडते.

हेही वाचा- न्यूजर्सीच्या ‘ली’, व्‍हर्जिनियाची जेन यांना रामटेकच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ

समाजातील आजचे वास्तव उदासीन आणि भीतीदायक आहे. अशा काळात माणसे व्यक्त होत नाहीत. त्यामुळे अशा माणसांचे माध्यम होऊन साहित्यिकांनी समाजातील वास्तव समोर आणले पाहिजे. आज लेखक, कवींना शब्दांमध्ये व्यक्त होण्याची भीती असली, व्यक्त झाल्यावर त्यांना गुन्हेगार ठरवले जात असले तरी त्यांनी हे गुन्हे, केलेच पाहिजे. आजच्या कोणत्याही लेखकाला राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक भान असणे आणि ते त्याने निर्भयपणे व्यक्त करणे ही काळाची आणि आपल्या समाजाची गरज आहे. लिहिणाऱ्या स्त्रीयांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 13:46 IST
Next Story
“मी कुठेतरी वाचलंय, रेडा हे…”, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही वाघ होतो!”