विदर्भ राज्य व्हावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने येत्या १५ फेब्रुवारीला विदर्भ गर्जना यात्रा निघणार असल्याची माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी २४ जानेवारीला पत्रकार परिषदेत दिली.
ही यात्रा विदर्भ राज्य आंदोलनाचा भाग म्हणून काढली जाणार असून सिंदखेडराजा ते कलेश्वर-गडचिरोली, अशी राहणार आहे. १७ फेब्रुवारीला यात्रा रात्री ७ वाजता मेहकर येथे पोहोचणार असून तेथे सभा व मुक्काम असेल. १८ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता सुलतानपूर, ११.३० वाजता बिबी व १ वाजता दुपारी सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन मेळावा आटोपून सायंकाळी ६ वाजता देऊळगावराजा, ७.३० वाजता टाकरखेड व रात्री ८.३० वाजता चिखली येथे सभा व मुक्काम करणार आहे.
१९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता बुलडाणा येथे कार्यकर्ता मेळावा, सभा व पत्रकार परिषद, दुपारी ३ वाजता भादोला, ४ वाजता वरंवड, ५ वाजता रोहणा, ६ वाजता खामगाव व रात्री ८.३० शेगाव येथे सभा व मुक्काम असेल. २० फेब्रुवारीला ९ वाजता ही यात्रा बाळापूरकडे प्रयाण करणार आहे, अशी यात्रेसंदर्भात चटप यांनी माहिती दिली.
या यात्रेदरम्यान विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, तसेच विदर्भावर होत असलेला अन्याय, सिंचनाचा अनुशेष, वाढलेले कुपोषण, ५ जिल्ह्यातील नक्षलवाद, वाढलेले प्रदूषण, सिंचनाअभावी करपून जाणारी पिके, कमी येणारा शेतमालाचा उतारा, याबाबत खंत व्यक्त करून कर्जाची सक्तीची वसुली करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अरुण केदार, अरविंद भोसले, तेजराव मुंढे, दामोधर शर्मा, दत्ता पाटील, डॉ. हसनराव देशमुख, वामनराव कणखर, एकनाथ पाटील, डॉ.बाबुराव नरोटे आदी उपस्थित होते.