पिंपरी-चिंचवडमध्ये ATM फोडून १५ लाखांची रक्कम घेऊन पोबारा करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. कौतुकास्पद म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या चपलेवरून गुन्हा उघड करून गुन्हेगारांपर्यंत पोहचत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने अक्षरशा सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणजे काय असतं, याचाच प्रत्यय आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या एटीएम फोडीच्या घटनेत बँक कॅशिअरसह इतर एका कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं तपासात पुढे आलं आहे. रोहित काटे हा मुख्य आरोपी असून तो सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशिअर आहे. त्याच्यासह रोहित गुंजाळ आणि आनंद मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर सचिन सुर्वे याला देखील गुन्हे शाखा युनिट दोनने ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित काटे हा सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशिअर म्हणून एक वर्षांपासून काम करतो. तर, रोहित गुंजाळ हा देखील त्याच बँकेत काम करतो. दोघांनी संगनमत करून पुणे – नाशिक रोड लगत असलेल्या बँकेच्या शेजारील एटीएम फोडण्याचा प्लॅन केला. त्यानुसार, यात रोहित गुंजाळचा नातेवाईक आनंद मोरे आणि सचिन सुर्वे यांना देखील सहभागी करण्यात आलं. मुख्य आरोपी रोहित काटे आणि रोहित गुंजाळ यांनी एटीएमच्या लॉकरची बनावट चावी बनवून ती आनंदला दिली शिवाय पासवर्ड ही सांगितला.

आज पहाटेच्या सुमारास आनंद आणि सचिन सुर्वे यांनी एटीएममध्ये जाऊन पासवर्ड आणि बनावट चावीचा सहायाने लॉकर उघडून त्यामधून १५ लाखांची रोकड लंपास केली. चोरी दरम्यान, एटीएम मधील सीसीटीव्ही फोडण्यात आला. मात्र, एक मिनिटाच फुटेज रेकॉर्ड झालं होतं. पैसे घेऊन दोघेही फरार झाले होते. आज सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर भोसरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत सीसीटीव्ही तपासला. तेव्हा, आनंद नावाच्या आरोपीने चप्पल घातली असल्याच निदर्शनास आलं. तसेच, चोरीच्या घटनेत बँकेच्या कर्मचाऱ्याचा समावेश असावा असा संशय पोलिसांना आला. बँकेतील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचा मोबाईल तपासण्यात आला. तेव्हा, रोहित गुंजाळच्या मोबाईलमध्ये तशाच प्रकारची चप्पल घातलेला व्यक्तीचा फोटो निदर्शनास आला. याबद्दल पोलिसांनी विचारले असता तो त्याचा नातेवाईक असून त्याचे नाव आनंद मोरे असल्याच समोर आलं. त्याला भोसरी पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केल्याचं उघड झालं.

पुढील तपासात रोहित काटे याने इतर दहा लाखांची बँकेची फसवणूक केल्याचही समोर आलं आहे. त्याचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली