scorecardresearch

पत्नीसाठी प्रचाराचं भाषण केलं, खुर्चीवर बसले अन् स्टेजवरच मृत्यूने गाठलं; लातूरमधील धक्कादायक Video

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार असून त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला

Latur Amar Nade dies
ते स्टेजवरच कोसळळे अन् एकच धावपळ सुरु झाली (फोटो सौजन्य – व्हायरल व्हिडीओवरुन साभार)

Latur Amar Nade dies Video: लातूरमधील मुरुड गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यात सध्या ग्राम पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून अशाच एकाच प्रचारसभेमध्ये पत्नीसाठी भाषण केल्यानंतर एका व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. भाषण संपवून खुर्चीवर पत्नीच्या बाजूला बसल्यानंतर काही क्षणात ही व्यक्ती हृदयविकाराचा झटका आल्याने स्टेजवरच कोसळले. रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं.

मुरुडमधील ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये मुरुड परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून अमर नाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांची पत्नी अमृता या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. आपल्या पॅनलसाठी अमर यांनी २५ मिनिटं भाषण केलं. त्यानंतर ते मंचावरील खुर्चीवर बसले अन् काही क्षणांमध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अमर यांच्या मृत्यूने पत्नी अमृताबरोबरच नाडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आमच्या पॅनेलला मतदान करा असं आवाहन करत अमर यांनी आपलं भाषण संपवलं. आत उंचावून नमस्कार केला आणि भाषण संपवून स्टेवरील खुर्चीवर जाऊन बसले. मात्र त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार पत्नीकडे केली. पत्नी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करेपर्यंत ते ग्लानी आल्याप्रमाणे खुर्चीवरुन सरकले. त्यानंतर स्टेजवर एकच धावपळ झाली. अमर हे खुर्चीवरुन खाली सरकले आणि त्यांनी मान टाकल्यानंतर काही जण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अमर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच अमर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

मुरुड ही लातूरमधील सर्वात मोठी ग्राम पंचायत आहे. १८ सदस्य असलेल्या या पंचायतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून अमर नाडे आणि त्यांचे काक दिलीप नाडे यांची सत्ता आहे. मात्र अमर नाडे यांनी यंदा चुलत्याविरोधातच पॅनल उतरवलं होतं. चुतल्याविरोधातील अनेक मुद्दे अमर नाडे यांच्या भाषणात होते. मात्र हेच अमर नाडेंचं शेवटचं भाषण ठरलं. अमर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 13:02 IST
ताज्या बातम्या