महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. त्यावेळी या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार असल्याचीही चर्चा जोरदार होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करून एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका आणि चर्चा होत असत. त्यातच १७ जानेवारी म्हणजेच महापालिका निवडणूक निकालाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी गोविंदबागेत झालेली एक बैठक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडिओबाबत कोण काय म्हणालं हे पाहुयात.

शरद पवार काय म्हणाले?

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ १७ जानेवारीचा आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याकरता ही बैठक झाल्याचं शरद पवारांच्या गटाकडून सांगण्यात येतंय. तसंच खुद्द शरद पवारांनीही मान्य केलं की, “गेल्या चार महिन्यांपासून विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती. १२ फेब्रुवारी अधिकृत विलिनीकरण करण्यात येणार होतं. पण त्याआधीच अजित पवारांचं अपघाती निधन झालं.” १७ जानेवारी झालेल्या बैठकीबाबत व्हायरल होत असलेल्या व्हिडिमध्ये शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे, अमोल कोल्हे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार दिसत आहेत.

जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील या बैठकीबाबत म्हणाले, १६ जानेवारी रोजी रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातील काही प्रमुख नेत्यांची आणि त्यांची बैठक झाली. त्यापूर्वी हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितितही बैठक झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढविण्यासंबंधी आमची चर्चा झाली. जिल्हा परिषदेचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी लागत आहे. त्यानंतर आमच्या चर्चेतून १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा करू, असं ठरवलं. त्यानंतर १७ जानेवारीला सकाळी बारामतीमध्ये जाऊन आम्ही शरद पवारांच्या कानावर हा निर्णय टाकला, असं जयंत पाटील म्हणाले.

तर, १७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्याकरता संबंधित बैठक झाली होती, अशी माहिती सुनील तटकरे यांनी आज माध्यमांना दिली.

दरम्यान, १७ जानेवारीला गोविंदबागेत झालेल्या या बैठकीबाबत दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांकडून विविध विधाने येत असल्याने या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे