मालेगाव शहरातील एका घटनेने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभागातील बंद असलेले पथदीप सुरू करण्याची वारंवार मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची तक्रार करण्यासाठी आले असता लोक संघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्यासह प्रभागातील काही मुस्लिम नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण केल्याची घटना घडली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे.
काय आहे किरीट सोमय्यांची पोस्ट?
आत्ता मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज असं कॅप्शन देत किरीट सोमय्या म्हणाले, काही महापालिका कर्मचारी आणि नागरिकांद्वारे महापालिका वीज विभाग कार्यालयात, जाहीर रित्या नमाज पठण करण्यात आलं. पालिका आणि पोलिसांनी हे मान्य केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी ह्या संबंधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी या सगळ्या प्रकरणाबाबत काय म्हटलं आहे?
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रभागात अनेक दिवसांपासून रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. यामुळे रात्री अपघात, चोरी व असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा वेगळा मार्ग अवलंबल्याचे सांगण्यात येते.
महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल
महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा विषय राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली. शासनाची वास्तू असलेल्या कार्यालयात अशा प्रकारे नमाज अदा करणे अयोग्य असल्याचा दावा करत, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मालेगावात या व्हिडीओची जोरदार चर्चा
नमाज पठाणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्या कारणाने वारंवार महानगर पालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती..त्या प्रभागातील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने विद्युत विभागाच्या कार्यालयातच या नागरिकांनी नमाज पठण केलं. मालेगाव शहरत हा चांगलाच चर्चेचा हा विषय बनला असून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

