Vidhan Bhavan Mumbai Bomb Threat: विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाचा मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ विधानभवनाच्या इमारतीचा ताबा घेत तपासणी केली. यानंतर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली आहे.

धमकीचा मेल आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना योगेश कदम म्हणाले की, “ई-मेल आला होता ही बाब खरी आहे. अजून ईमेलचा सोर्स काय होता, ई-मेल कोणी पाठवला होता याचा तपास चालू आहे. अनेकवेळा धमक्यांचे हॉक्स ईमेल्स येत असतात. प्राथमिकदृष्ट्या असाच प्रकारचा हा ई-मेल असावा असा अंदाज आहे. तथापि विधिमंडळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॅडने येथे येऊन पाहाणी आणि तपासणी केली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे. येथे कुठलाही प्रकारचा धोका नाही.”

अशा प्रकारचे ईमेल वारंवरा पाठवून डायव्हर्जनचा प्रयत्न असतो. परंतू असे हॉक्स ई-मेल्स अनेकवेळा येताना आपण पाहिलेले आहेत. हा तशाच प्रकारचा ईमेल असावा असा अंदाज आहे, असेही योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

धमकीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का?

क्षेपणास्त्राने उडवून देण्याची धमकी येणं याला काही आंतरराष्ट्रीय संदर्भ असू शकतात का? असा प्रश्न विचारला असता कदम म्हणाले की, “असं मिसाईलने उडवणं म्हणजे, भारतावरती हल्ला करणं. आंतरराष्ट्रीय दृष्ट्या आपलं जे राजकीय वलय आहे, ते पाहाता तशी शक्यता अतिशय कमी आहे. आज मध्यपूर्वेत युद्ध चालू आहे. अशावेळी जो ईमेल आला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं कदाचित चुकीचं राहिल. धमक्यांचे हॉक्स ईमेल्स वारंवार येत असतात, प्राथमिकदृष्ट्या हा तशाच पद्धतीचा ईमेल वाटतो आहे. तरी देखील ईमेलच्या सोर्सचा तपास चालू आहे,” असे योगेश कदम म्हणाले.

विधिमंडळ तसेच मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा मुंबई पोलिसांकडून वारंवार आढावा घेतला जातो, असेही योगेश कदम म्हणाले.

आज अजित पवारांच्या अपघाती निधनावर चर्चा होणार आहे, या विषयावरून लक्ष वळवण्यासाठी हा मेल पाठवण्यात आला असे वाटते का? असा प्रश्न योगेश कदम यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना कदम म्हणाले की, “मेलचा सोर्स काय आहे हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. ते तपासण्याचे काम अजून सुरू आहे. त्यामुळे तसे तर्क लावणे चुकीचे राहिल,” असे योगेश कदम म्हणाले.