अहिल्यानगर : विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक प्राधिकार मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे उद्या, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) सचिन जगताप यांच्या उमेदवारीचा निर्णय न झाल्यास मतदानात वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
शरद पवार गटाचे माजी आमदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी काल, शनिवारी भाजप प्रवेश केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत तनपुरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम मुदत आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरे यांना उमेदवारीचा शब्द दिल्यामुळे तनपुरे यांनी पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला नव्हता.
दरम्यान भाजपचे तनपुरे उद्या अर्ज दाखल करणार असले तरी महायुतीमधील अजित पवार गटाने अहिल्यानगरच्या जागेवर दावा करत या जागेवर माजी आमदार स्व. अरुण जगताप यांच्या कुटुंबीयांचा उमेदवारीवर पहिला हक्क असल्याचा दावा केला आहे. हा दावा करताना पक्षाचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक गणेश भोसले यांनी आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांना उमेदवारी द्यावी अन्यथा राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडणुकीच्या मतदानात वेगळा विचार करतील असा इशारा दिला आहे. नगरसेवक भोसले हे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत तसेच सचिन जगताप हे संग्राम जगताप यांचे बंधू आहेत. त्यामुळे भोसले यांच्या दाव्या मागे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे समर्थन असल्याचे मानले जाते.
यासंदर्भात बोलताना गणेश भोसले यांनी सांगितले, स्व. अरुण जगताप हे दोनवेळा या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत संघटना उभी केली. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांचा नैतिक व राजकीय हक्क सर्वप्रथम विचारात घेतला पाहिजे. सचिन जगताप यांना उमेदवारी देऊन त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचा सन्मान करावा.
राष्ट्रवादीची शहरात पाळेमुळे रुजवण्यात व त्याचा वटवृक्ष करण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले. त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राजकारणात जे पेरले तेच उगवते. निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या निर्णयाचे परिणाम सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक विधान परिषदेच्या निवडणुकीत योग्य न्याय झाला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यावर आरोप
आमदार संग्राम जगताप समर्थक नगरसेवक गणेश भोसले यांनी यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. तटकरे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी झटत आहेत. पक्षातील नेते आपल्या मतदारसंघापूरतेच मर्यादित राहिले तर पक्षाची अवस्था शरद पवार गटासाठी होईल, अशी टीकाही भोसले यांनी केली आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्यावरही टीका
राष्ट्रवादीचे भोसले यांनी भाजपचे प्राजक्त तनपुरे यांच्यावरही टीका केली आहे. भोसले म्हणाले स्व. अजित पवार यांचा आमदार संग्राम जगताप यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री करण्याचा आग्रह होता. मात्र एका ‘मामा’च्या हट्टापायी शेवटच्या टप्प्यात त्यांना डावलण्यात आले व कारखानदारीला प्राधान्य देण्याचा निर्णय शरद पवार गटातील नेतृत्वाने घेतला. जनाधार व कार्यकर्त्यांची ताकद बाजूला ठेवून वारसा हक्काच्या राजकारणाला महत्त्व देण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना व जनतेचा कौल दुर्लक्षित करून एका भाच्याला पुढे केले गेले. आज तोच भाचा सत्तेच्या लोभासाठी भाजपमध्ये गेला आहे. ज्यांच्या आशीर्वादाने राजकीय उंची मिळाली, त्यांच्याच राजकीय भूमिकेला छेद देण्याचे काम सुरू आहे.
