लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून २६ जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे गटाने कोणतीही चर्चा न करता परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या चारही जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. यावरून महाविकास आघाडीच बिघाडीची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी माझा फोन घेणं टाळलं असून त्यांच्या मनात काय?, याबाबत सवाल उपस्थित केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. हेही वाचा : सरकारकडून मनोज जरांगेंचा काटा काढण्याचा प्रयत्न? शिंदेंचे आमदार म्हणाले, "काही प्रस्थापितांनी…" नाना पटोले काय म्हणाले? "उद्धव ठाकरे लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांना फोन केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधान परिषदेच्या दोन जागा आम्ही लढतो. दोन जागा तुम्ही लढा. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं की तुमचे उमेदवार कोण आहेत? त्यानंतर मी त्यांना उमेदवारांची नावं सांगितली. यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून तिकीट जाहीर केलं", असं म्हणत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. ते पुढं म्हणाले, "मूळ प्रश्न हा आहे की, एकदा महाविकास आघाडीतील सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकणं आम्हाला सोप्प झालं असतं. मात्र, त्यांनी विधानपरिषदेच्या चारही जागा घोषित केल्या. आता आज सकाळपासून उद्धव ठाकरेंना मी फोन करत होतो. पण त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय? हे भेटल्यावरच कळेल. मुंबईत आम्ही उमेदवार दिलेला नाही. मात्र, त्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणूनच लढायला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसची आहे", असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दोन उमेदवार मागे घेण्याची मागणी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे. आता या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरे गटाकडे कोणक पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार मागे घेण्याची विनंती केली असल्याचं बोललं जात आहे. तसेच मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधरची उमेदवारी कायम ठेवावी, असं काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं असल्याची चर्चा आहे.