पुण्यातली विसर्जन मिरवणूक ३२ तासांहून अधिक तास चालली. तसंच डीजेचा दणदणाटही कायम होता. विद्यानंद बापट यांनी डीजे आणि लाऊड स्पीकर बंदी विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे विद्यानंद बापट हे चांगलेच चर्चेत आले. आता याच विद्यानंद बापट यांनी पुण्यातल्या डीजे आणि लाऊड स्पीकर्सबाबत प्रतिक्रिया दिली आहे. २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती. त्या दिवशी सुरू झालेली मिरवणूक ही ३२ तासांहून अधिक तास चालली. उत्सवखोरांना आवाहन करून ते ऐकतील हे समजणारा माणूस मुर्खांच्या नंदनवनात वावरणारा असेल असं म्हणत विद्यानंद बापट यांनी भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले विद्यानंद बापट?

अनंत चतुर्दशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही मी नारायण पेठ पुणे या ठिकाणी माझ्या घरातच होतो. मला रक्तदाब किंवा इतर विकार नाहीत. त्यामुळे मी हा गोंगाट सहन करण्याच्या स्थितीत आहे. पण ही सार्वत्रिक समस्या आहे. सार्वजनिक समस्या आहे. निर्णायकरित्या ही समस्या आम्हाला सोडवायची आहे. अलका चौकात कानठळ्या बसवणारा आवाज होता याबाबत विचारलं असता विद्यानंद बापट म्हणाले की हो कारण लातो के भुत बातोंसे नहीं मानते. त्यामुळे उत्सवखोरांना आवाहनं करून ते काहीतरी चांगलं करतील अशी ज्याची अपेक्षा आहे तो खरंच मूर्खांच्या नंदनवनात वावरत असेल असं म्हणत विद्यानंद बापट यांनी डीजे आणि लाऊड स्पीकरच्या दणदणाटावर संताप व्यक्त केला. विद्यानंद बापट यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

एआय जनरेटेड व्हिडीओजबाबत काय म्हणाले बापट?

रात्री १२ वाजताही उत्सवखोरांनी शांतता पाळली ती नियम असल्याने. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने. उत्सवखोरांना आवाहन करून ते ऐकतील ही अपेक्षाच ठेवता कामा नये असंही विद्यानंद बापट म्हणाले. तसंच त्यांचे जे मीम्स प्ले करून डीजे लावण्यात आले त्यावरही त्यांनी रोखठोक भूमिका घेतली. विद्यानंद बापट म्हणाले, जनावरांचं मलमूत्र खाणारे हे उत्सवखोर एआय जनरेटेड काहीतरी व्हिडीओ करतात त्याकडे काय लक्ष द्यायचं? पंतप्रधानांचेही व्हिडीओ तयार केले गेले होते. त्यामुळे माझे केले गेले तर काही विशेष बाब नाही. पण जनावरांचं मलमूत्र खाणारे म्हणजेच गोमूत्र आणि शेण खाणाऱ्यांचे खरे व्हिडीओ जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला ते अधिक हास्यास्पद वाटतात. ते व्हिडीओ त्यांनी लावावेत म्हणजे नास्तिकांचं तरी मनोरंजन होईल.

उत्सवखोरांना परवानगीची मिजास आहे-बापट

उत्सवखोरांना जी काही मिजास या उत्सवखोरांना आली आहे ती परवानगीची मिजास आहे. रात्री १२ ते ६ या काळात कसं त्यांनी सगळं बंद ठेवलं? आम्हाला ती शांतता दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस आणायची आहे. करोना काळात थांबले होते कारण संचारबंदी आणि जमावबंदी लागू होती. या सगळ्यांना मिजास त्यांच्या देवभोळेपणाची नाही. तर त्यांना मिळालेल्या परवानगीची आहे. जी पार्शली अंमलबजावणी केली जाते आहे ती आम्ही नक्की करू. शेण-गोमुत्राची आणि परवानगीची मिजास आम्ही खाडकन उतरवू असं विद्यानंद बापट म्हणाले आहेत. तसंच अशा प्रकारे संमती मिळायला कायद्यातल्या पळवाटा जबाबदार आहेत असंही विद्यानंद बापट म्हणाले.