पुण्यात गणेश उत्सवांच्या तोंडावर विद्यानंद बापट यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण विद्यानंद बापट यांनी लाऊड स्पीकर्स आणि डीजे बंद केले पाहिजेत अशी रोखठोक आणि परखड भूमिका घेतली आहे. आज टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. पण यानंतर विद्यानंद बापट यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच माझ्यावरचा हल्ला सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचंही ते म्हणाले. तुमची भूमिका हिंदू विरोधी आहे का? असं विचारलं असता विद्यानंद बापट यांनी त्यावरही उत्तर दिलं आहे.
लाऊड स्पीकर आणि डीजे लावायचे असतील तर बंदीस्त सभागृहात लावा-विद्यानंद बापट
विद्यानंद बापट म्हणाले, की डी. जे.च्या लाऊड स्पीकर्सचा आवाज बंद करावा. जर लाऊड स्पीकर लावायचेच असतील ते बंदीस्त सभागृहात ठेवावेत आणि पाहिजे त्या डेसिबलला ते वाजवावेत. जेणेकरुन कुणालाच त्रास होणार नाही. तुम्हाला १०० डेसिबल हवं आहे तर ते आम्हाला १ डेसिबलचं नको आहे अशी ही विन विन सिच्युएशन निर्माण होईल असं विद्यानंद बापट म्हणाले आहेत. सतीची प्रथा महाभारत काळापासून सुरु होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात लॉर्ड बेटिंगने बंद केली. बालविवाहाची प्रथाही मुघलांच्या काळात होती. मुंजीच्या आधी लग्न होती. आपण संमती वयाचा कायदा आणून ती प्रथा बंद केली. बहुभार्या पद्धती होती ती आपण बंद केली. प्रथा आहे म्हणून मुलभूत मानवी हक्कांवर गदा येते आहे तरीही सुरु ठेवायची का? तर त्याचं उत्तर नाहीच येतं. शांततेत जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा हे विशद केलं आहे. त्यामुळे मी आवाज उठवला आहे असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हिंदू विरोधी आहात का? हे विचारताच काय म्हणाले बापट?
तुम्ही हिंदू विरोधी आहात का? तुमची भूमिका हिंदू विरोधी आहे का? कारण तसे आरोप तुमच्याव होत आहेत, हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विद्यानंद बापट म्हणाले, माझ्यावर होणाऱ्या या आऱोपांमध्ये अजिबात काही तथ्य नाही. मी ना हिंदू विरोधी आहे ना मुस्लिम विरोधी आहे. ओवेस पेचकर नावाचे एक वकील आहेत त्यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती तेव्हा गणेश उत्सवांबाबत निर्देश दिले होते. त्यावर पेचकर म्हणाले होते की हे तुम्ही ईदबाबतही सांगा, ज्यावर कोर्टाने सांगितलं की आम्ही लोकांचे उत्सव म्हणजेच पब्लिक फेस्टिव्हल असं म्हटलं आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही. सार्वजनिक साजरे केले जाणारे सण आणि उत्सव, ते सगळ्याच धर्मांना लागू आहे.
धर्म स्वातंत्र्य हे व्यक्तिगत आयुष्यापुरतं मर्यादित-विद्यानंद बापट
विद्यानंद बापट पुढे म्हणाले, धर्म स्वातंत्र्य हे तुमच्या व्यक्तिगत आयुष्यापुरतं मर्यादित आहे. घरगुती, कौटुंबिक पातळीवर तुम्ही सण-उत्सव साजरे करत असाल तर आम्ही त्यावर बंदी आणण्याची मागणी केलेली नाही. त्याबाबत आम्ही प्रबोधन करु पण सक्तीने ते बंद केले जावेत ही आमची मागणी नाही. पण जेव्हा सार्वजनिक रित्या हे सण साजरे केले जातात आणि लाऊडस्पीकर्स लावता, रस्त्यावरच अतिक्रमण वाढवता, मिरवणुकांमुळे रहदारीला अडथळा करता या गोष्टी वेगळ्या करणं गरजेचं आहे. माझ्यावर आरोप करणारे लोक धर्म स्वातंत्र्य आणि नागरी समस्या या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे मान्यच करायला तयार नाहीत. आम्ही नागरी समस्यांबाबत बोलतो आहे. धर्मस्वातंत्र्य हे व्यक्तिगत पातळीवर असलं पाहिजे असं परखड मत विद्यानंद बापट यांनी व्यक्त केलं आहे.
