विद्यानंद बापट यांनी डी.जे. आणि लाऊड स्पीकर्सच्या विरोधात जी मोहीम सुरु केली आहे त्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसंच आता विद्यानंद बापट हे नावही सगळ्यांच्याच परिचयाचं झालं आहे. डी.जे. आणि लाऊड स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना विद्यानंद बापट यांनी उत्सवखोर असं म्हटलं आहे. आता विद्यानंद बापट यांना दहीहंडीबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्सवखोरांनी त्यांची घाण त्यांच्यापाशी ठेवावी असं उत्तर विद्यानंद बापट यांनी दिलं आहे.

काय म्हणाले विद्यानंद बापट

दहीहंडीमध्ये जे ध्वनी प्रदूषण झालं त्याबाबत आणि नर्तिका नाचवल्या गेल्या त्याबाबत प्रश्न विचारला असता विद्यानंद बापट म्हणाले, “माझं हे म्हणणं आहे ज्यांना ही काही कटकट करायची आहे ती त्यांनी ती कटकट त्यांच्यापाशी ठेवावी. जसं की सवाई गंधर्व हा महोत्सव एका बंदिस्त सभागृहात साजरा केला जातो. ढोल-ताशे आणि लाऊड स्पीकर्सची कटकट आहे ती बंदिस्त प्रेक्षागृहात कोंबावी. तुमची कटकट तुमच्यापाशी ठेवा. एक हजार डेसिबलला ती कटकट ऐका आणि बहिरे होऊन बाहेर या आमचं काहीही म्हणणं नाही. आमची शांतता आम्हाला हवी. असं विन-विन सोल्युशन आम्ही देतो आहे.” असं ध्वनी प्रदूषणाबाबत विद्यानंद बापट म्हणाले. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.

दहीहंडीच्या उत्सवात नृत्यांगना नाचवल्या गेल्या त्याबाबत काय म्हणाले बापट?

त्यानंतर नृत्यांगनाबाबत मत मांडत विद्यानंद बापट म्हणाले, “बंदिस्त प्रेक्षागृहात काहीही करा. उत्सव आणि नागरिक याचं सेग्रिकेशन करायचं आहे. आम्हाला उत्सवखोरांची घाण नको आहे. आम्हाला आमचं आयुष्य शांततेत जगायचं आहे. आम्ही शांततापूर्ण आयुष्य जगणारे नागरिक आहोत. उत्सवखोरांना आम्हाला हाकलून द्यायचं आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही काहीही करा. तुम्ही बहिरे व्हा, मरुन पडा. आम्हाला काही घेणंदेणं नाही. तुमचं तुमच्यापाशी आणि आमचं आमच्या पाशी. आम्हाला उत्सवखोरांचा संसर्ग नको.” असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.

उत्सव जवळ आल्यानंतर लोकांच्या छातीत धडकी भरते ही दहशतच आहे-बापट

उत्सव जवळ आल्यानंतर लोकांच्या छातीत धडकी भरते, लोक त्या दिवसांसाठी बाहेर जातात. आम्हाला पूर्णपणे वेगळेपण हवं. माझी भूमिका टोकाची नाही. हे परफेक्ट सोल्युशन आहे. उत्सव जवळ आल्यावर नागरिकांना धडकी भरत असेल तर ती दहशतच आहे ना? त्याला दुसरं काय म्हणणार? पुण्यातच नाही इतर शहरांमध्ये हीच स्थिती आहे. उत्सवखोरांचे उत्सव हे समाजासाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. पोलिसी बलप्रयोगाने हे सगळं मोडून काढावं. लाठीमार, स्मोक, पॅलेट गन या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने बंद करावं. अन्यथा ही गोष्ट फोफावत राहिल. पुरेशा बलप्रयोगाने ही उत्सवखोरी मोडून काढली पाहिजे. टप्पटप्प्याने बलप्रयोग वाढवत न्यावा असं मला वाटतं आहे. बलप्रयोग पुरेसा करावा आणि उत्सवखोरी मोडून काढावी म्हणजे ते वेड पांघरुन पेडगावला जात राहतील. लातो के भूत बातोंसे तो मानेंगे नहीं. असंही विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.