Vidyanand Bapat Assault Pune Loudspeaker Controversy: सार्वजनिक ठिकाणी डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरू नये, अशी भूमिका विद्यानंद बापट हे सातत्याने मांडत आले आहेत. त्यांच्या भूमिकेला समाजातील काही घटक आणि सोशल मीडियावर जोरदार प्रसिद्धी मिळत आहे. गुरूवारी सकाळी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना विद्यानंद बापट यांनी हा मुद्दा पुन्हा मांडला. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून हल्लेखोराचाही एक व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान कथित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीवर कथित हल्लेखोराचा एक जुना व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. “गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर आणि ढोलपथकाचा त्रास होतो, असे सांगत काही जण उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करावा, अशी मागणी काही लोक करत आहेत. त्यांची मागणी प्रसारमाध्यमातून दाखवली जात आहे. पण एक पुणेकर म्हणून मला खरी परिस्थिती सांगायची आहे. त्यामुळे मी काही आकडेवारी आपल्यासमोर ठेवू इच्छितो”, असे या तरुणाने व्हिडीओद्वारे सांगितले.

हल्लेखोराने पुढे म्हटले, “पुणे शहरात एक खासदार, आठ आमदार आणि १६५ नगरसेवक आहेत. पण वास्तव काय आहे? काही ठराविक नेते सोडले तर कुणीही मंडळाच्या बाजूने ठामपणे बोलत नाहीत. जर कुणी बोलले तरी त्यांची भूमिका स्पष्टपणे कळत नाही. ते मंडळाच्या बाजूने बोलतात की विरोधात हेच समजत नाही. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा हेच मंडळातील कार्यकर्ते राजकारण्यांच्या प्रचारासाठी फिरतात. सभांना गर्दी करतात.”

विद्यानंद बापट यांचे नाव घेऊन म्हणाला…

हल्लेखोराने आपल्या व्हिडीओत विद्यानंद बापट यांचेही नाव घेतले होते. तो म्हणाला, “विद्यानंद बापट तुम्हाला यानिमित्ताने सांगू इच्छितो की, साऊंड सिस्टीममुळे सर्वसामान्यांना त्रास होत असेल. पण आवाजाची मर्यादा पाळली तर काहीच अडचण होणार नाही, असे मला वाटते. पुण्यातील १४०० मंडळांपैकी समजा ७०० मंडळे लाऊडस्पीकर लावत असतील तर तुम्ही ७०० मंडळांना साऊंड बंद करायला सांगत नाहीत तर ८ हजार घरांमधील चूल बंद करायला सांगत आहात.”

मंडळात जिथे साऊंड लावला जातो, तिथे लाईट लावला जातो. जनरेटर, ट्रॅक्टर-ट्रॉली आल्या, हमाल, ऑपरेटर, सजावट करणारे असे हजारो लोक कार्यरत असतात. हे लोकही आपलेच आहेत. त्यांच्या पोटावर पाय कशासाठी? असाही प्रश्न हल्लेखोराने आपल्या व्हिडीओत उपस्थित केलेला आहे.

पुण्यात उत्सवकाळात हजारो कोटींची उलाढाल – हल्लेखोर

“गणेशोत्सव आला की काही पर्यावरणवादी जागे होतात आणि उत्सव कसा साजरा करायचा याचे ज्ञान देतात. आज पुणे शहरात ३,८०० ते ४,००० छोटे आणि मोठे गणेश मंडळ आहेत. तर नोंदणीकृत असलेले १४०० मंडळ आहेत. या मंडळांचा १२ दिवसांचा खर्च १०० कोटींच्या वर जातो. हा पैसा आपल्या पुण्यातच राहतो. घरगुती गणेशोत्सवांची आकडेवारी गृहित धरल्यास हा खर्च हजार कोटींवर पोहोचतो. विद्यानंद बापट यांनी हे लक्षात घ्यावे”, असेही या हल्लेखोराने आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.