सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात भूमिका मांडणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात एका व्यक्तीने हल्ला केला. बापट हे एका टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना ही घटना घडली. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतो. तो राऊतवाडी येथील ‘प्रियदर्शनी गणेश मंडळा’चा माजी अध्यक्ष आहे.

विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय आहे?

“अशा पद्धतीनं मारहाण करणं योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हल्ला करणं योग्य नाही. पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाहीत. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्या दृष्टीनं पाऊल उचलले पाहिजेत” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नेमकं काय घडलं?

पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. याच मुद्द्यावर ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण सुरू असतानाच गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण तिथे आला. “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा सवाल करत त्याने बापट यांच्याशी हुज्जत घातली. “मला याला आणखी दोन मारू द्या,” असे म्हणत त्याने थेट बापट यांच्यावर हात उगारला आणि मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया

हल्ल्याच्या या घटनेनंतर बोलताना विद्यानंद बापट यांनी ‘टीव्ही ९’ मराठीला प्रतिक्रिया दिली. बापट म्हणाले, “सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक वेडा माणूस आला आणि त्याने हा प्रकार केला. त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते.”