पुण्यात गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ ऑगस्ट) पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत या हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच विद्यानंद बापट जे बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे. कोणतेही सण-उत्सव लोकांना आनंद देणारे असले पाहिजेत. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला हा मुलभूत अधिकारांवरील हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज (४ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. मात्र, ते जे म्हणत आहेत त्याला अर्थ आहे. कोणताही उत्सव हा सुखद असला पाहिजे. कोणतेही सण-उत्सव लोकांना आनंद देणारे पाहिजेत. डीजेचे आवाज आणि रस्त्यावरील कार्यक्रम यामुळे कोणत्याही सणाचं किंवा उत्सवाचं गांभीर्य कमी होतं. त्यामुळे यावर जर कोणीतरी मत व्यक्त केलं आणि मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला होतो, हे माझ्या मते लोकशाहीवर आणि लोकांच्या मुलभूत अधिकारावर हल्ला आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकार व प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनेकांनी विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला, याच्याशी मी देखील सहमत आहे. अशा घटना थांबायला पाहिजेत. जर हे थांबत नसेल तर संबंधित यंत्रणांनी सक्तीचं धोरण स्वीकारलं पाहिजेत. सोलापूरमध्येही डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे असे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं?
“अशा पद्धतीनं मारहाण करणं योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हल्ला करणं योग्य नाही. पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाहीत. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्या दृष्टीनं पावलं उचलले पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यानंद बापट हे गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. याच मुद्द्यावर ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण सुरू असतानाच गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण तिथे आला. “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा सवाल करत त्याने विद्यानंद बापट यांच्याशी हुज्जत घातली. “मला याला आणखी दोन मारू द्या,” असं म्हणत त्याने थेट बापट यांना मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर हल्लेखोर व्यक्तीला पोलीसांनी अटक केली आहे.
