Vidyanand Bapat DJ Banned Statemet : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे बंदी व्हावी म्हणून विद्यानंद बापट यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. विविध माध्यमांना मुलाखती देऊन ते त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, ते नास्तिक असल्याचंही त्यांनी वेळोवेळी आपल्या मुलाखतींमधून सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचा श्रीकृष्ण कोण असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अत्यंत चपखल उत्तर दिलंय.

संस्कृतनिष्ठ मराठी भाषेत संवाद साधताना ते पुराणातील, इतिहासातील अनेक दाखले देत आहेत. समाजात एकट्या माणसाने क्रांती कशी घडवून आणावी? किंवा तुमच्यासारख्या अनेकांना समाजात बदल घडवण्याची इच्छा असेल पण एकट्याने काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतो, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विद्यानंद बापट यांना न्यूज १८ मराठीच्या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही स्वतःच स्वतःला कमी समजत आहात. हे कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखं आहे. श्रीकृष्णशीष्टाई होते आणि श्रीकृष्ण जेव्हा रंणागणावर जातो तेव्हा अर्जून भीष्ण, द्रोण वगैरेंना पाहून ऐनवेळेस म्हणतो की हे माझ्याच्याने होणार नाही. श्रीकृष्ण त्याला तेच सांगतो की होऊन होऊन काय होईल? की तू धारातीर्थी पडशील. मृत्यू जरी झाला तरी तू स्वर्गालाच जाणार आहेस. जिंकलास तर तू पृथ्वीचा उपभोग घेणार आहेस. युद्ध तुला करावंच लागणार आहे, त्याचा निकाल काहीही लागला तरी.”

विद्यानंद बापट यांनी महाभारताचा दाखला दिल्याने त्यांना लागलीच तुमचा श्रीकृष्ण कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते सहज बोलून गेले की, “मी स्वतःच.” यावेळी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकही सांगितला. “उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥” असं बापट म्हणाले.

विद्यानंद बापट यांच्या या श्लोकाचा अर्थ असा की, “मनुष्याने स्वतःच्या मनाद्वारे स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला अधोगतीला नेऊ नये (स्वतःचा घात करू नये); कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रूही आहे.”