Vidyanand Bapat Pune DJ Loudspeaker Controversy: गणेशोत्सवात लाऊडस्पीकर, ढोल-ताशांना विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांचे नाव आता राज्यभरात चर्चेत आहे. आधी पुणे महानगरपालिकेतील जनसभेतून त्यांची झालेली हकालपट्टी आणि त्यानंतर ३ सप्टेंबरला त्यांना झालेल्या मारहाणीमुळे मुख्यमंत्र्यांपासून सर्वच यंत्रणांना त्यांची दखल घ्यावी लागली. तत्पूर्वी विद्यानंद बापट हे त्यांच्या भाषिक आणि वैचारिक ज्ञानामुळे चर्चेत आले. सोशल मीडियावर त्यांचे अनेक मीम्स तयार होत असून त्याला लोकांकडून पसंती मिळत आहे. तसेच माध्यमांशी बोलताना तर्कावर आधारीत विचार मांडल्यामुळे त्यांच्या बोलण्याचे कौतुक होत आहे. आज त्यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही असेच महत्त्वाचे मुद्दे मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दिला दाखला
विद्यानंद बापट यांना गणेश मंडळांनी विरोध केला असला तरी अनेकजण त्यांच्या बाजूने उभे राहत आहेत. याबद्दल त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला माझे महत्त्व वाढवायचे नाही. माझे मुद्दे जर पुढे रेटले जात असेल तर चालेल. पण माझे व्यक्ती माहात्म्य मला वाढवायचे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधान सभेच्या भाषणातही हा मुद्दा मांडला होता. व्यक्ती माहात्म्य वाढवणे हे घातक असू शकते, असे ते म्हणाले होते. मला स्वतःचे महत्त्व वाढवून घ्यायचे नाही.
‘पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथांनाही विरोध होईल’
गणेश मंडळे आणि डिजे समर्थकांकडून बापट यांचा विरोध होत आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ जरी माझ्यासारखे बोलले तरी त्यांनाही विरोध केला जाईल. काही लोकांना वाट्टेल ते करून फक्त धुडगूस घालायचा आहे. त्यांना सण-उत्सव याच्याशी काही घेणे देणे नाही. जे धार्मिक उत्सव प्रेमी आहेत, त्यांना हा धुडगूस आवडत नाही. खासदार मेधा कुलकर्णी यांनीही लाऊडस्पीकरला विरोध केलेला आहे.
‘भावना काय शरीराचा अवयव आहे का?’
विद्यानंद बापट यांच्या विधानांमुळे आमच्या भावना दुखावल्या जात आहेत, असा आरोप काहींनी केला आहे. यावर बापट म्हणाले की, भावना म्हणजे छाती, पोट, डोके नाही, जे दुखायला लागेल. हा हास्यास्पद कांगावा आहे. भावना ही काही दुखायची गोष्ट नाही. तर्काचे उत्तर देता येत नसल्यामुळे हा फक्त कांगावा आहे.
‘जिवंत राहिलो तर मोर्चात जाईन’
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याच्यासंदर्भात बोलताना विद्यानंद बापट म्हणाले, “जर मी जिवंत असेन आणि मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत असेन तर मी मोर्चात सहभागी होणार आहे. मला भिती वाटत नाही. पण डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचं काय झालं, ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यामुळे केव्हा काय होईल हे मी सांगू शकत नाही.”
