गणेशोत्सवातील लाऊडस्पीकर, डीजे, ढोल-ताशांच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांचे नाव आता राज्यभरात चर्चेत आहे. आधी पुणे महानगरपालिकेच्या जनसभेतून झालेली हकालपट्टी आणि नंतर ३ सप्टेंबरला त्यांना झालेल्या मारहाणीमुळे ही ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. विद्यानंद बापट त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे आणि अभ्यासपूर्ण भूमिकांमुळे ही सर्वत्र चर्चेत आहेत. थेट मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषेचे विशेष कौतुक केले आहे.

पोलिसांनी तुडवायला पाहिजे…

विद्यानंद बापट यांना काही दिवसांपूर्वी पुण्यात मारहाण झाली होती. त्या मारहाणीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी, “हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तुडवले पाहिजे,” अशी मागणी केली होती. ह्याच मुद्द्यावर लोकसत्ताच्या मुलाखतीत बापटांना प्रश्न विचारण्यात आला. या वेळी मुलाखतकाराने विचारले, “हे वक्तव्य म्हणजे तुम्ही तुमची पातळी ओलांडली नाही का? कारण भारतीय न्यायसंहितेत ‘पोलिसांनी तुडवायला पाहिजे’ असे कुठेही नाही. हे कायद्याला धरून नाही, ही मागणी बेकायदेशीर आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?”

यावर बापट म्हणाले, “झॉम्बीसोबत झॉम्बीसारखेच लढावे लागते. व्यवहारात जर एखादी गोष्ट करणे गरजेचे असेल आणि त्याशिवाय ते होणारच नसेल, तर ते करायलाच पाहिजे.” अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली.

विद्यानंद बापटांचा पुढचा मोर्चा राजकीय सभांकडे

‘ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती वाढली आहे. आता लोक जाहीररित्या बोलत आहेत. त्यामुळे या लढ्याला व्यापक संघटित रूप येताना दिसत आहे. हा लढा रचनात्मक पद्धतीने पुढे कसा नेता येईल, याचा विचार सुरु आहे. रहदारीला अडथळे आहेत. ध्वनिप्रदूषण आहेच. पण, हे प्रश्न केवळ सण-उत्सवांपुरते मर्यादीत राहणार नाही. राजकीय प्रचारसभा आदी विषयही हाती घेण्यात येतील,’ अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. ‘शेवटी एक व्यापक समाजभान निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.