गेल्या काही दिवसांपासून विद्यानंद बापट हे चांगलेच चर्चेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात बापट आवाज उठवत आहेत. डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी ते करत आहेत. डीजेमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत विद्यानंद बापट हे ठाम भूमिका मांडत आहेत. मात्र, या डीजेबंदीच्या मागणीवरून त्यांच्यावर टीकाही होत आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना विद्यानंद बापट यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे. भविष्यात विद्यानंद बापट राजकारणात प्रवेश करतील का? किंवा सध्या एखाद्या राजकीय पक्षाची ऑफर त्यांना आली आहे का? किंवा सध्याच्या राजकारणातील कोणता नेता जास्त चांगला वाटतो? याबाबत पहिल्यांदाच विद्यानंद बापट यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना मोठं भाष्य केलं आहे.
विद्यानंद बापट काय म्हणाले?
सामाजिक चळवळीत दिसणारे विद्यानंद बापट हे भविष्यात राजकारणात दिसतील का? असा प्रश्ना विचारण्यात आला. यावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “नाही. माझा फोकस हा फक्त सिटीझन अॅक्टिव्हिजमवर राहिलेला आहे. कारण कोणत्याही जिवंत लोकशाहीमध्ये सिटीझन अॅक्टिव्हिजम ही महत्वाची गोष्ट असते. अन्यथा काय होतं की आपल्याला असं दिसतं की निवडणुका होतायेत आणि लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत वैगेरे. पण प्रत्यक्षात निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता हम करे सो कायदा अशी होते. त्यामुळे त्यांच्यावर वचक राहण्यासाठी सिटीझन अॅक्टिव्हिजम गरजेचा असतो. गेल्या दोन आठवड्यात मला सिटीझन अॅक्टिव्हिजम वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे माझा फोकस कायम सिटीझन अॅक्टिव्हिजमवर असतो आणि तो कायम राहील”, असं बापट म्हणाले.
तुम्हाला राजकीय पक्षाची ऑफर आली का?
तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षाची ऑफर आली का? या प्रश्नावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “मला ऑफरही आलेली नाही आणि मला त्याच्याशी देणंघेणं देखील नाहीये. कारण माझा फोकस सिटीझन अॅक्टिव्हिजमवर आहे.”
तुम्हाला कोणता नेता आवडतो?
तुम्हाला कोणता नेता आवडतो? असा प्रश्न विचारण्यात आला असता विद्यानंद बापट म्हणाले की, “मला कोणीही राजकीय नेता आवडत नाही. कारण मी व्यक्ती प्रामाण्यवादी नाहीये, तर मी बुद्धी प्रामाण्यवादी आहे. कारण व्यक्ती येतात आणि जातात, म्हणजे व्यक्ती मरते. पण विचार कधीही मरत नाहीत. त्यामुळे मी व्यक्ती प्रामाण्यवादी नसल्यामुळे मी व्यक्ती आदर्श मानत नाही.”
तुमच्या पाठिशी अदृश्य शक्ती आहे का?
तुम्ही सध्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवत आहात. मात्र, एखादं बंड जेव्हा होतं, तेव्हा त्यामागे एखादी अदृश्य महाशक्ती असते आणि हे नंतर जनतेलाही कळतं. मग तुमच्यामागे अशा प्रकारची काही अदृश्य महाशक्ती आहे का? असा सवाल विचारण्यात आला.
यावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “नाही. माझ्या पाठिशी अशी कोणतीही महाशक्ती किंवा अदृश्य शक्ती नाहीये. पण अशी शक्ती आहे की नाही, याची तुम्ही दखलच घ्यायची नाही. मी प्रत्येकवेळी अशा प्रकारचे हास्यास्पद आरोप ऐकत असतो, त्यामुळे माझं आधी मनोरंजन व्हायचं. पण आता तेही होत नाही. मी जे सांगतो ते तुमच्या कानात घुसत नाही. तुम्ही माझ्या बोलण्याचा प्रतिवाद करा. पण ते देखील हे करत नाहीत. कारण तो प्रतिवाद तुम्हाला करता येत नाही”, असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं.
अशा काही संस्था किंवा संघटना आहेत का? त्या तुम्हाला किंवा तुमच्या चळवळीला साथ देत आहेत? या प्रश्नावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “हो. अनेक नागरिकांनी आणि संस्थांनी मला तसं सांगितलं आहे. मात्र, त्याबाबत मी आता काही बोलणार नाही.”
