Vidyanand Bapat : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी बापट यांनी केली आहे. यावरून अनेकजण मतमतांतरे मांडत आहेत. मात्र डीजे, लाऊडस्पीकर आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट हे आपली ठाम भूमिका मांडताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट हे अनेक माध्यमांना आणि पॉडकास्टना मुलाखतीत देत ध्वनिप्रदुषणाबाबतचा मुद्दा अत्यंत चपखलपणे मांडत आहेत. दरम्यान, ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांनी ‘लोकसत्ता’च्या मुलाखतीत बोलताना विविध मुद्यांवर महत्वाचं भाष्य केलं आहे. यावेळी विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषण विरोधातील चळवळीला आता संघटनात्मक स्वरुप देण्याच्या मुद्यावरही पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.
विद्यानंद बापट काय म्हणाले?
तुम्ही अनेक लोकांना एकत्र आणत एखादी संघटना काढणार आहात का? किंवा एखादी संघटना असेल तर त्या संघटनेत सामील होऊन तुम्ही काम करणार का? की फक्त एकटेच लढत राहणार? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना विद्यानंद बापट यांनी म्हटलं की, “आम्ही वेगळी संघटना सुरू करू किंवा दुसऱ्या एखाद्या संघटनेत सामील होऊ हा मुद्दाच नाहीये. थोडक्यात सांगायचं तर आमचं साध्य जिथे-जिथे एक असेल, इशू बेस्ट अलायन्स हा कायम नियम असेल, म्हणजे मुद्यांवर अधारीत सहकार्य. मग अन्य शंभर गोष्टींवर मतभेद असतील. मात्र, या ध्वनीप्रदूषण निर्मूलनाच्या मुद्यांवर ज्यांची-ज्यांची सहमती असेल, त्यांचं सहकार्य आम्ही घेत राहू. मात्र, या ध्वनीप्रदूषण निर्मूलनाच्या मुद्यांवर एकमत असणं गरजेचं असेल”, अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली आहे.
“आमचे एक अन्वर शेख म्हणून सहकारी आहेत, त्यांचं ‘मिस फराह’ म्हणून एक ट्रस्ट आहे. त्यांनी ठाम असं सांगितलेलं आहे की स्तर हा सवालच उपस्थित होत नाही, म्हणजे एवढे बेस किंवा एवढे स्तर किंवा ते डेसिबल वैगेरे. आम्ही ते डेसिबल मोजत बसायचे वैगेरे हा सवालच उपस्थित होत नाही. खुल्या जागेत किंवा कोणत्या इमारतीच्या बाहेर किंवा एखाद्या मोकळ्या जागेत आम्हाला ध्वनिवर्धक यंत्र नको आहे. मग या मुद्यावर अन्वर शेख यांची सहमती आहे, म्हणजे अशा मुद्यांवर ज्यांची सहमती असते त्यांचं सहकार्य आम्ही घेत राहू”, असं विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केलं.
विद्यानंद बापटांचा पुढचा मोर्चा राजकीय सभांकडे
‘ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती वाढली आहे. आता लोक जाहीररित्या बोलत आहेत. त्यामुळे या लढ्याला व्यापक संघटित रूप येताना दिसत आहे. हा लढा रचनात्मक पद्धतीने पुढे कसा नेता येईल, याचा विचार सुरु आहे. रहदारीला अडथळे आहेत. ध्वनिप्रदूषण आहेच. पण, हे प्रश्न केवळ सण-उत्सवांपुरते मर्यादीत राहणार नाही. राजकीय प्रचारसभा आदी विषयही हाती घेण्यात येतील,’ अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. ‘शेवटी एक व्यापक समाजभान निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
