गणेशोत्सव २०२६ च्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात पुण्यातील सजग नागरीक विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला. ते त्यांच्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि लढा देत आहेत. डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. दरम्यान एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बुळ्या, निष्क्रिय समाजाची चिड माझ्या मनात आहे असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.
ध्वनी प्रदूषणाबाबत मी परखडपणे बोलतो कारण…
निष्क्रिय, बुळ्या किंवा कचखाऊ समाजाची चिड माझ्या मनात आहे. ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा बघा. पुण्यासारख्या आणि इतर शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण हे कळसाला पोहचलं आहे. सण-उत्सवांच्या हास्यास्पद सवयी या शहरांनी लावून घेतल्या आहेत. मला त्याचा त्रास होतो आहे पण मला एकट्याला त्रास होतोय का? वैयक्तिक आवड-निवड नाही. अनेक लोकांना याचा त्रास होतो आहे. पण ते या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवायलाच कचरत आहेत. त्यांनाच मी बोटचेपे आणि कचखाऊ म्हणतोय. पुणे म्हणजे सांस्कृतिक राजधानी वगैरे म्हणत टेंभा मिरवणारे हेच लोक आहेत. ग्राफिटीचे टी शर्ट घालतात जाज्वल्य अभिमान म्हणजे पुणे वगैरे. अशा लोकांची, अशा समाजाची मला चिड आहे.
ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा आहे, पुण्याच्या अभिमानाचे टेंभे कसले मिरवता?
आज सोलापूरसारखं अर्धग्रामीण शहर बघा. नरसय्या अडाम तिथे निवडून जायचे. ते विडी कामगारांचे नेते होते. पुण्याचे तुमचे टेंभे काय तर सहज दगड मारला तरी विद्वानच माणूस सापडेल. टेंभे मिरवणाऱ्यांमध्ये आणि समस्यांशी झगडणाऱ्यांमध्ये हा विरोधाभास आढळतो. हे ब्लॅक आणि ते व्हाईट असं असलं पाहिजे होतं. मला वाटतं की हा प्रश्न तर आधीच सुटायला हवा होता. किंबहुना इथे ही समस्या असायलाच नको होती. त्यामुळे माझ्या मनात चिड आहे. कुणीच मूर्ख त्याविरोधात आवाज उठवत नाहीये, त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी त्याच प्रामाणिकपणे लढा देतो आहे असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. डिजिटल चावडी या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी हे विधान केलं आहे.
पक्ष किंवा संघटना उभी करण्याचा विचार आहे का? काय म्हणाले विद्यानंद बापट?
जे तुमचे विचार आहेत त्या सगळ्याचं एकत्रित करुन पक्ष किंवा संघटना उभं करणं असं काही तुमच्या मनात आहे का? असं विचारलं असता, राजकारणात जाण्याचा किंवा असं काही सुरु करण्याचा विचार नाही. कारण लोकशाहीसाठी एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे नागरिकांचं सक्रिय असणं, ते नसेल तर समाजात लोकशाही जरी संवैधानिक दृष्ट्या असेल, तरीही ती ऑटोक्रसी होऊन जाते. माझी संकल्पना अमेरिकन सिटिझन अॅक्टिव्हिझम मधून प्रेरित आहे. कारण तिथे ही संकल्पना कळसाला पोहचली आहे. आपल्याकडे मला तरी असं वाटतं की फक्त कागदोपत्रीच लोकशाही आहे. अशा टेक्निकली डेमोक्रसी असलेल्या देशांमध्ये राज्यकर्ते राजासारखे वागायला लागतात त्यामुळे मग ती लोकशाही उरत नाही. असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. संघटनात्मक स्वरुप द्यायला माझा काही विरोध नाही. मला कसलं श्रेय वगैरे नको आहे कुणी समविचारी लोक एकत्र येऊन माझ्या तत्त्वांना मुरड न घालता जर संघटन होणार असेल तर ते असायला माझी ना नाही. पण माझी अद्याप काही रुपरेखा ठरलेली नाही. असंही विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.
