Vidyanand Bapat : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, यावरून त्यांच्यावर टीका देखील होत आहे. डीजे, लाऊडस्पीकर आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट हे आपली ठाम भूमिका मांडताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी विविध माध्यमांना आणि पॉडकास्टना मुलाखतीत देत ध्वनिप्रदुषणाबाबतचा मुद्दा अत्यंत चपखलपणे मांडला. संयमी आणि प्रभावी मराठी भाषेत त्यांनी त्यांचा मुद्दा समाजासमोर ठेवला. मात्र, सध्या विद्यानंद बापट यांच्या प्रभावी मराठी भाषेबाबत आणि त्यांच्या काही शब्दांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यापैकी एक म्हणजे “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्…” या शब्दांचा नेमका अर्थ काय? याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने आता खुद्द विद्यानंद बापट यांनीच या शब्दांचा अर्थ आजच्या (४ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितला आहे.
विद्यानंद बापट यांनी उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ काय?
विद्यानंद बापट यांनी बोलताना अनेकदा “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्” हे शब्द उच्चारले होते. या शब्दांचा नेमका अर्थ काय? याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विद्यानंद बापट यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विद्यानंद बापट यांनी या शब्दांचा अर्थ सांगितला आहे.
विद्यानंद बापट यांनी सांगितलं की, “चीप पब्लिसिटी ज्यांना हवी असते, म्हणजे सवंग प्रसिद्धी मी म्हणतो ते. त्याचा उपहास म्हणजे सटायर (Satire) करणारे संस्कृतमधील ते सुभाषित आहे. घटंम् म्हणजे मातीची मडकी, ती फोडावी आणि पटं छिन्द्यात्, पट म्हणजे कापड आणि छिन्द्यात् म्हणजे फाडावी. कुर्याद् गर्दभरोहणम्, गर्दभरोहणम् म्हणजे गाढव. ते सामान वाहून नेण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यावर घोड्यासारखं माणसांनी बसावं. म्हणजे मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे आणि कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे असा याचा अर्थ आहे”, असं विद्यानंद बापट यांनी सांगितलं आहे.
विद्यानंद बापट नक्की कोण आहेत?
विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. ते एका सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यानंद बापट हे ३७ वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या ८ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. त्यांचे आई-वडील रत्नागिरीत असतात, तिथे विद्यानंद यांचं बालपण गेलं. तिथंच त्यांनी शिक्षण घेतलं. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिप्रदुषणाविरोधात आवाज उठवल्यानंतर विद्यानंद बापट यांची राज्यात चर्चा सुरू आहे.
