विद्यानंद बापट हे नाव हे सगळ्यांनाच समजलं आहे. याचं कारण त्यांनी केलेला ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा. डी.जे. आणि लाऊड स्पीकर यांविरोधात आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी हाच मुद्दा मांडत असताना त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. यानंतर आता त्यांनी आपण हिंसेचं समर्थन करतो का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मी भगतसिंग यांच्या विचारांना मानतो असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.

मला जेव्हा दिमागी नक्षल किंवा…

अंनिसची पद्धत ही थेट ईश्वर किंवा इतर शक्तींवर थेट बोलत नाही. पण ईश्वर नाही ही विचारसरणी तुम्हाला मान्य असेल तर ब्राईट्स किंवा भगतसिंग विचारसरणी महत्त्वाची आहे. वाईटपणा थोडाफार घ्यायचा असेल तर अंनिसमध्ये जाऊ शकता. पण तुम्हाला पूर्ण वाईटपणा घ्यायचा आहे तर तुम्ही ब्राईट्स सारखी विचारसरणी मान्य करु शकता. मला ती मान्य आहे. कारण मी त्या प्रगल्भतेला पोहचलो आहे त्यामुळे मी ती विचारधारा स्वीकारली आहे. जेव्हा मला जे दिमागी नक्षल, अर्बन नक्षल असंही म्हटलं जातं ते म्हणणाऱ्यांना मी विचारतो की याची व्याख्या काय ती आधी विशद करा ती त्यांना सांगता येत नाही असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.

धर्म स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे पण…

धर्म स्वातंत्र्य हे आम्हाला मान्य आहे. त्याबाबत काही आक्षेप नाही. पण लोकांना त्रास होईल हे धर्म स्वातंत्र्यात येत नाही. या सबबीखाली बचाव कसा करता येईल? त्यात प्रबोधन करून काय होणार? असा प्रश्न विद्यानंद बापट यांनी विचारला आहे. वाहतुकीच्या गोष्टी सामूहिक असतात, प्रायव्हेट जेट वगैरे काही प्रत्येकाकडे असणार नाही. ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मला हे सांगावंसं वाटतंय की आता इअर फोनचा पर्याय हा गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध झाला आहे. ध्वनी प्रदूषण किंवा जे श्राव्य आहे त्यात आता स्पीकरच हवा असं नाही. शिवाय ते ५० रुपयांपासून इअर फोन मिळतात. सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास झाला पाहिजे हा उद्देशच लाऊड स्पीकर किंवा डी.जे. वापरात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. तांत्रिकदृष्ट्या आम्हाला हे वापरलं गेलं पाहिजे असं काही आवश्यक नाही असंही विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. विद्यानंद बापट यांनी पुढारी या न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्यात त्यांनी हे विधान केलं आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात मी बोलतो आहे, माझा फोनही सायलेंटवरच असतो-बापट

मी ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात बोलतो आहे. माझा फोनही सायलेंट मोडवर असतो. जे रिंगटोनवर मोबाइल फोन ठेवतात ते मुद्दाम ठेवत असावेत. मी राईट टू प्रायव्हसीसाठीही लढतो आहे. मला इतके दिवस कुणीही ओळखत नव्हतो. पण मीडियाकडून मला एक्सपोजर मिळाला आहे. आता हल्ला झाल्यापासून तर माझ्याबरोबर पोलीस असतात. मी डाव्या विचारांचा आहे. माझ्या संरक्षणासाठी पोलीस असावा असं मला वाटत नाही. राईट टू प्रायव्हसीवर गदा आली आहे. प्रसिद्धी म्हणाल तर मला सवंग प्रसिद्धी नकोच आहे. पण कार्यसिद्धीसाठी ती होते आहे. मी ज्या कारणासाठी लढतो आहे, पण मी प्रसिद्धीच्या विरोधात आहे. उद्दीष्टासाठी मी प्रसिद्धीला सामोरा जातो आहे मला त्यात रस नाही असंही विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.