Vidyanand Bapat : सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट हे मागील काही दिवसांपासून आवाज उठवत आहेत. डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी ते करत आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात बापट यांनी आवाज उठवल्यानंतर हा मुद्दा सध्या राज्यभरात गाजत आहे. यावरून अनेकजण वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. मात्र, डीजे आणि लाऊडस्पीमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात विद्यानंद बापट हे आपली ठाम भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर अनेकजण विद्यानंद बापट यांच्यावर देखील टीका करत आहेत. मात्र, तरीही ध्वनिप्रदुषणाचा मुद्दा बापट अतिशय चपखलपणे मांडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे. डीजेच्या विरोधात भूमिका मांडत असताना तुमच्यापाठिशी काही अदृश्य महाशक्ती आहे का? याबाबत पहिल्यांदाच बापट यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना मोठं भाष्य केलं आहे.
विद्यानंद बापट काय म्हणाले?
तुम्ही सध्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवत आहात. मात्र, एखादं बंड जेव्हा होतं, तेव्हा त्यामागे एखादी अदृश्य महाशक्ती असते आणि हे नंतर जनतेलाही कळतं. मग तुमच्यामागे अशा प्रकारची काही अदृश्य महाशक्ती आहे का? असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “नाही. माझ्या पाठिशी अशी कोणतीही महाशक्ती किंवा अदृश्य शक्ती नाहीये. पण अशी शक्ती आहे की नाही, याची तुम्ही दखलच घ्यायची नाही. मी प्रत्येकवेळी अशा प्रकारचे हास्यास्पद आरोप ऐकत असतो, त्यामुळे माझं आधी मनोरंजन व्हायचं. पण आता तेही होत नाही. मी जे सांगतो ते तुमच्या कानात घुसत नाही. तुम्ही माझ्या बोलण्याचा प्रतिवाद करा. पण ते देखील हे करत नाहीत. कारण तो प्रतिवाद तुम्हाला करता येत नाही”, असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.
अशा काही संस्था किंवा संघटना आहेत का? की त्या तुम्हाला किंवा तुमच्या चळवळीला साथ देत आहेत? या प्रश्नावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “हो. अनेक नागरिकांनी आणि संस्थांनी मला तसं सांगितलं आहे. मात्र, त्याबाबत मी आता काही बोलणार नाही.”
विद्यानंद बापट राजकारणात एन्ट्री करणार?
सामाजिक चळवळीत दिसणारे विद्यानंद बापट हे भविष्यात राजकारणात दिसतील का? असा प्रश्ना विचारण्यात आला. यावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “नाही. माझा फोकस हा फक्त सिटीझन अॅक्टिव्हिजमवर राहिलेला आहे. कारण कोणत्याही जिवंत लोकशाहीमध्ये सिटीझन अॅक्टिव्हिजम ही महत्वाची गोष्ट असते. अन्यथा काय होतं की आपल्याला असं दिसतं की निवडणुका होतायेत आणि लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत वैगेरे. पण प्रत्यक्षात निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता हम करे सो कायदा अशी होते. त्यामुळे त्यांच्यावर वचक राहण्यासाठी सिटीझन अॅक्टिव्हिजम गरजेचा असतो. गेल्या दोन आठवड्यात मला सिटीझन अॅक्टिव्हिजम वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे माझा फोकस कायम सिटीझन अॅक्टिव्हिजमवर असतो आणि तो कायम राहील”, असं बापट म्हणाले.
