पुण्याचे विद्यानंद बापट हे नाव आता सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक झालेलं आहे. डी.जे. आणि डॉल्बीला त्यांनी सक्त विरोध दर्शवला आहे. २४ ऑगस्टला जी एक बैठक पुणे महापालिकेत पार पडली त्या बैठकीत सर्वात आधी हा मुद्दा विद्यानंद बापट यांनी मांडला होता. त्यानंतर विद्यानंद बापट प्रसिद्धी झोतात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. आता एका मुलाखतीत हल्लेखोराबाबत काय वाटतं असं विचारलं असता विद्यानंद बापट यांनी त्यांवर उत्तर दिलं आहे.
हल्लेखोराबाबत काय म्हणाले विद्यानंद बापट?
“समाजात अनेक लोक सवंग प्रसिद्धीसाठी माकडचाळे करत असतात. मी असा मूर्खपणा कधीच करत नाही. सवंग प्रसिद्धी ज्यांना हवी असते तेच लोक असे माकडचाळे करतात. मी त्याची दखलही घेत नाही. मला माझ्या कार्यावर फोकस करायचा आहे.” असं म्हणत विद्यानंद बापट यांनी हल्लेखोराबाबत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
रत्नागिरीत डीजेचा त्रास होतो का?
रत्नागिरीत डीजेचा त्रास होतो का? असं विचारलं असता पुण्यात जास्त आहेत. रत्नागिरीमध्येही होतं आहे. पुण्यात मात्र तीव्रता अधिक आहे. संपूर्ण राज्यात आणि देशातूनच हे बंद झालं पाहिजे असं मला वाटतं आहे. असं विद्यानंद बापट म्हणाले. मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून मी विविध लोकांना निवेदनं देत होतो. ऑगस्ट महिन्यात जी बैठक झाली त्यानंतर मग माध्यमांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. पुढारीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
साधेपणाने उत्सव साजरे केले जाणार असतील तर..
आम्ही सध्या ज्या पद्धतीने उत्सव साजरे करतो आहोत तसेच जर उत्सव साजरे केले जाणार असतील आणि असं जर तुम्ही म्हणत असाल तर दखल घेता येईल. नागरिकांनी बाहेर जावं वगैरे याला काही अर्थ नाही. हा तार्किक प्रतिवाद नाही. नागरी किंवा सामाजिक समस्या निर्माण होणार नाही असा उत्सव साजरा झाला पाहिजे असं म्हणत असतील मी दखल गेऊ शकतो. पण तसं कुणी म्हणताना आत्ता तरी दिसत नाही, असंही विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. ढोलताशांमुळेही आवाज येतो आणि शेकड्याने तक्रारी येतात, शिवाय त्यातली एकही मी केलेली नाही. पण नागरिकांना त्याचा त्रास होतो कारण दोन महिने आधीपासून त्यांचा सराव असतो. नदी किनारी राहणाऱ्या लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. सैनिकांना जोश आणण्यासाठी रणवाद्यं वाजवली जात होती. जे उदाहरण दिलं जातं आहे तेव्हाचं लोकांचं दैनंदिन जीवन आणि आत्ताचं यात फरक पडला आहे.
