विद्यानंद बापट यांनी पुण्यातल्या डीजे आणि ढोलताशांच्या विरोधात आवाज उठवला आहे. विद्यानंद बापट यांच्या म्हणण्यानुसार ही समस्या मानवनिर्मित आहे आणि याचा उत्सवाशी किंवा परंपरांशी काहीही संबंध नाही. या सगळ्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढतं. यानंतर विद्यानंद बापट यांच्यावर टीका करण्यात आली. विद्यानंद बापट पुण्याचे नाहीत असं म्हटलं गेलं. तसंच विद्यानंद बापट यांनी पुणे हे शहर म्हणजे इतर शहरांसारखंच साधं आहे त्यात काही विशेष नाही असंही म्हटलं आहे.

विद्यानंद बापट यांचं म्हणणं काय?

विद्यानंद बापट पुण्याचे नाहीत अशी टीका तुमच्यावर झाली, याबाबत विचारलं गेलं तेव्हा विद्यानंद बापट म्हणाले, “हा आरोप बेसलेस आहे, एखाद्याचा मुद्दा खोडता आला नाही की मग त्या व्यक्तीवरच हल्ला करा या मानसिकतेतून हे बोललं जातं. कारण तुम्ही माझ्या मुद्द्याशी प्रतिवाद करु शकत नाही म्हणून हे बोलत आहात. गणेश उत्सव सुरु करणारे लोकमान्य टिळकही रत्नागिरीहून आले होते. आणखी मुद्दे सांगता येतील. मी पुण्यातला नाही, पण जे लोक पुण्यात राहात आहेत कुणी एका पिढीपासून राहात असेल कुणी चार पिढ्यांपासून त्यांनाही त्रास होतो आहेच त्याचं काय? लोकमान्य टिळक रत्नागिरीहून आले पण टिळक कुटुंबही आता पाच ते सहा पिढ्यांपासून पुण्यातच आहे. सगळ्याच पुणेकरांना त्रास होतो आहे त्याचं काय? सगळे नागरिक जाहीररित्या मांडत आहेत. बरं ही समस्या नागपूर, मुंबई सगळ्याच शहरांमध्ये आहे त्याचं काय? तार्किक प्रतिवाद करता न येणारे लोक विधान करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही हल्ला करत आहात.” असा प्रश्न विचारत बापट यांनी उत्तर दिलं आहे. राहुल कुलकर्णींच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पुणेकरांना पूर्वीपासून टेंभा मिरवायची सवय आहे की..

तुम्हाला पुण्यातला गणेशोत्सव नीट कळला नाही असाही आरोप होतो आहे, हे विचारलं असता विद्यानंद बापट म्हणाले, पुणेकरांना पूर्वीपासून एक टेंभा मिरवायची सवय आहे. अभिमान, जाज्वल्य अभिमान, स्वाभिमान पुण्यात दगड मारला तरी ज्याला लागतो तो विद्वानच असतो वगैरे. पुणे अन्य शहरांसारखंच एक शहर आहे, त्यात जगावेगळं काही नाही. योगायोगाने पेशव्यांनी राजधानी करायची ठरवली म्हणून महत्त्व आलं. त्यांनी जर सातारा राजधानी करायची ठरवली असती तर सातारा सांस्कृतिक राजधानी झाली असती. पेशव्यांनी राजधानी करायची ठरवल्याने पुणे सांस्कृतिक शहर म्हणून विकसित झालं, नाहीतर पुण्यात आणि इतर शहारांमध्ये काहीच वेगळं नव्हतं. पेशव्याच्या काळात राजकीय राजधानी पुणे होती त्यामुळे नंतर ती सांस्कृतिक राजधानी झाली. पुणेकर वेगळे आहेत वगैरे काही नाही. कारण जर तर वेगळे आहेत तर मग ध्वनी प्रदूषणासारखी मानवनिर्मित समस्येने तुम्ही अजूनही ग्रस्त कसे काय? सोलापूर हे अर्धग्रामीण शहर जर अशा पद्धतीचा बदल करू शकतं तर मग पुण्यात या गोष्टी का होत नाहीत? सांस्कृतिक राजधानीचा टेंभा मिरवणारे पुणेकर ढोल ताशा आणि डीजे च्या समस्यांनी पीडित कसे? आता तरी जागे व्हा. ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवा, बाकी कोण कुठून आलं अमुक व्यक्ती इथून आली, तिथून आली याला काही अर्थ नाही असंही बापट म्हणाले.