विद्यानंद बापट हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी डीजेला केलेला विरोध. डीजे, डॉल्बी आणि ढोल-ताशे यांच्या वादनामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि इतर सगळ्यांनाच त्रास होतो. त्यामुळे या प्रथा वगळून तुम्ही हे उत्सव साजरे करा अशी मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे. या मुद्द्यावर भूमिका मांडत असताना त्यांना दोन दिवसांपूर्वी मारहाणही झाली. डी.जे. आणि डॉल्बीला विरोध समजू शकतो पण तुम्ही सती प्रथा, बालविवाह आणि इतर कुप्रथांची तुलना ढोल-ताशांशी कशी करता? असं विचारलं असता त्यावरही विद्यानंद बापट यांनी उत्तर दिलं आहे.
ढोल ताशांचं वादन आणि कुप्रथांची तुलना कशी काय होते?
ढोल ताशे हे आनंदासाठी वाजवले जातात, तुम्ही त्याची तुलना सती प्रथा, बालविवाह, जरठकुमारी विवाह अशा कुप्रथांशी कशी काय जोडता? असा प्रश्न विचारला असता विद्यानंद बापट म्हणाले, “ढोल-ताशे वाजवून तुमचा आनंद आहे जो इतरांसाठी शिक्षा आहे. कारण ढोल-ताशे हे ओपन एअर किंवा खुल्या वातावरणात वाजवले जातात. त्यामुळे ज्यांना आनंद होतो आहे ते ठीक आहे पण त्याची सक्ती अनेकांना होते आहे. ज्यांना आनंद होत असतील ते लोक येत असतील. पण एकाचा आनंद हा दुसऱ्यांसाठी सजा होता कामा नये. जे निवासी कायमस्वरूपी राहतात त्यांना त्याचा त्रास होतो. सराव बंदिस्त जागेत करायचा आणि विसर्जन मिरवणुकीला ढोल-ताशे जोरात वाजवायचे याला काहीच अर्थ नाही. मुळात असं आहे युएस इंडस्ट्री आपल्याकडेही चालते त्यामुळे २४ तास काम सुरु असतं कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात. वर्क फ्रॉम आलं आहे. त्यामुळे एखादा एरिया इंडस्ट्रियल दुसरा नागरी असा तुम्ही वेगळा करु शकत नाही.” असं उत्तर विद्यानंद बापट यांनी पुढारीला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे.
लोकांना सक्तीचे श्रोते बनवता हे चूक आहे-विद्यानंद बापट
ढोल ताशे हे मनोरंजनाचं साधन म्हणून लोक त्याच्याकडे आता पाहात नाहीत. त्यांना त्यांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांची साधनं आहेत. त्यांना त्यांच्या राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्यामुळे ढोल-ताशे ओपन एअर मध्ये वाजतात तेव्हा तुम्ही अशा लोकांना सक्तीचे श्रोते बनवता. त्यांना ते ऐकावंच लागतं. तर त्यामुळे जे करण्याचा आनंद वाटतो त्याचं सादरीकरण तुम्ही साऊंडप्रुफ जागेत करा. त्यामुळे त्याचा आनंद तुमच्यापर्यंत राहिल. संस्कृती आणि परंपरेला पूर्णतः विरोध नाही. पण तशाच्या त्या सुरु ठेवणं हे पटणार नाहीच. त्या गोष्टींमध्ये कालसुसंगत बदल केले गेले पाहिजेत. संस्कृती किंवा परंपरा पूर्णार्थाने बंद कराव्यात असं मी म्हणत नाही. अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे. शिवाय ते पुढे म्हणाले की संस्कृती आणि परंपरा हे जे सांगितलं जातं या मानवनिर्मित गोष्टी आहेत. फॉल्स नरेटव्ह बिंबवलं गेलं आहे, ते म्हणजे आत्ताच्या आता जे चाललं आहे ते तसंच चालवलं पाहिजे. कालसुसंगत बदल केले गेले पाहिजेत. इतरांना त्रास होणार नाही अशी मागणी केली तर त्यात गैर काय? चुकीच्या गोष्टी प्रथा परंपरांच्या नावे खपवल्या जातील तर ते तार्किकदृष्ट्या कसं मान्य करायचं? असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.
