सीमावर्ती भागात तपासणी नाके

सोलापूर : शेजारच्या कर्नाटकात ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे सीमावर्ती सोलापूरचे प्रशासन अधिक सजग झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले असून सीमा ओलांडून सोलापुरात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणीसह करोना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पाहिले जात आहे. शुक्रवारी दुपापर्यंत कर्नाटकातून येणारी तीनशे वाहने प्रवेश न देता परत पाठविण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक सीमेवर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, सांगोला आदी तालुके आहेत. कर्नाटकातून अफझलपूरमार्गे दुधनी, तर आळंदमार्गे वागदरीकडे येणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

दुसरीकडे विजापूरमार्गे टाकळीकडे येणाऱ्या रस्त्यावरही तपासणी नाका उभारण्यात आला आहे. याशिवाय मंगळवेढा व सांगोला भागातही कर्नाटकातून रस्त्यांवर तपासणी केली जात आहे. कर्नाटकातून येणाऱ्या मुख्य रस्त्यांबरोबरच इतर रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.

दरम्यान, कर्नाटक प्रशासनही महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असून आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आलेल्या तसेच दोन्ही लसमात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच कर्नाटकात प्रवेश करण्याची मुभा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ दर्शन करून पुढे कर्नाटकातील गाणगापुरात श्री दत्तात्रेय दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत आहे.