सासवड या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना माजी मंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आणि किस्से सांगितले आहेत. हशा आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी हे किस्से ऐकले. मी लहानपणी मस्तीखोर, वांड होतो असं विजय शिवतारे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले होते. सुनेत्रा पवारांच्या विरोधात मी उभा राहणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र नंतर त्यांचं बंड थंडावलं. अजित पवारांना आव्हान देणारे विजय शिवतारे हे त्यांच्या भन्नाट भाषणामुळे आता चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले विजय शिवतारे?

“लहानपणी मी खूप वांड होतो, प्रचंड बंडखोर, प्रचंड म्हणजे प्रचंड. चौथीत असताना विड्या ओढत असे. यावर तुमचा कुणाचा विश्वास बसेल का? गुरं वळायला जायचं, गुरं सोडायची, चालत हरकुळला जायचं, आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे आणि विडीचं बंड आणायचं. दोन, चार विड्या प्यायलो की चक्कर येऊन पडायचो.” असा किस्सा विजय शिवतारेंनी सांगितला.

बंडखोर असलो तरीही

“मी बंडखोर होतो तरीही पहिल्या क्रमांकावर होतो. मी अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आत्ताही शाळेत गेलात तरीही माझं नाव आहे. माझा हजेरी क्रमांक असा होता ना.. एक दिवस डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो होतो.” असंही शिवतारे म्हणाले.

हे पण वाचा- “मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा

बारामतीमुळे विजय शिवतारेंची चर्चा

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत रंगली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंनी निवडणूक लढवली. हायव्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. पण, ही निवडणूक सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची होती. पण या निवडणुकीत काही काळासाठी अजित पवारांची भलतीच तारांबळ उडाली होती. बारामतीतील राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी अजित पवारांची तारांबळ उडाली असून, महादेव जानकर यांना रोखल्यानंतर अजित पवारांचे कट्टर राजकीय वैरी बनलेल्या विजय शिवतारेंनी बारामती निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. पण अजित पवारांनी सर्व गणितं जुळवून शिवतारेंसोबत तह केला आणि शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली.