“फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होतं”; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे वक्तव्य केलं आहे.

Devendra-Fadanvis-Nitin-Gadkari-PTI
दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी मिळालं असलं तरी त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपा सध्या विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. त्यावेळच्या घडामोडींबद्दल आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींसोबत आधीच ठरवलं होतं, असं ते म्हणाले आहेत.

नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “नागपूरवाल्यांना माहित आहे. तिकडे भाजपामध्ये दोन टोकं आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नितीन गडकरी. दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गुपचूप सांगितलं की फडणवीसांची जिरवायची होती, तशी ती जिरली. आता पुन्हा जिरवायची आहे. पण कुणाची जिरेल ते कळेल”.

हेही वाचा – “महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे”

वडेट्टीवारांच्या या विधानावरुन चंद्रकांत पाटलांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासायची वेळ आता आली आहे. कारण ज्याला ज्याला जे सुचेल ते तो करत आहे आणि जिरवणे वगैरे हे जाहीर सभेत वापरण्याचे शब्द आहेत का? त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल हा जो स्वभाव महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा झाला आहे, त्याचाच तो भाग आहे. नितीनजी आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. आमच्या सगळ्यांचे पालक आहेत. ते आम्हा सर्वांची काळजी घेतात. त्यांची विचारांवरची आणि पक्षावरची निष्ठा टोकाची आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी हा शोध कुठून लावला ते माहित नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vijay vadettiwar on nitin gadkari and devendra fadnavis controversial statement vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या