Vijay Wadettiwar On Narhari Zirwal Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात विरोधकांनी टिकेची झोड उठवली असून मंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना एक मोठा दावा केला. मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओमागे एका माजी मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र, तो माजी मंत्री नेमकं कोण? हे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं नाही.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडीओ व्हायरल प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “असं आहे की जे नको आहेत ते टार्गेट होत आहेत. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. कारण स्पर्धा खूप आहे. एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा मंत्री टपूनच बसलेला आहे. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी लगेच तिसरा लाईनमध्ये बसलेला आहे. या प्रकरणात एक मोठं नाव समोर येत आहे. नरहरी झिरवाळांची ही जागा खाली करून घेण्यासाठी जो माजी मंत्री आहे, तोच हे सगळं करत आहे. याचं कारण जागा खाली झाली तर त्यांची एन्ट्री होईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

‘…तर तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील’ : विजय वडेट्टीवार

“मी काल बोलताना म्हणालो की जर पेनड्राईव्ह समोर आला तर कमीत कमी तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील. त्यामध्ये अतिशय गंभीर स्वरुपाच्या व्हिडीओ क्लिप आहेत. जर त्या क्लिप पुढे आल्या तर काही मंत्री हे पदावर राहू शकणार नाहीत. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातचे पाय धुतले तर त्यांचा राजीनामा घेतला. मात्र, त्यापेक्षाही विचित्र अशा क्लिप त्या पेनड्राईव्हमध्ये आहेत. केवळ मोबाईल आणि लॅपटॉप दाखवत आहेत. पण तो पेनड्राईव्ह लपवला जातोय. जेवढं सोईचं आहे तेवढंच त्या पेनड्राईव्हमधून काढून कारवाई केली जात आहे. मात्र, मोठे मासे जे आहेत, त्यांना वाचवण्यासाठी त्या क्लिप पूर्णपणे समोर येत नाहीत. हे सगळं अशोक खरात प्रकरणात घडलेलं आहे”, असा मोठा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मंत्री झिरवाळ का अडचणीत आले?

मंत्री झिरवाळ यांचा तृतीयपंथीयाबरोबरचा एक कथित अश्लील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकरणात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठवली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवाळ असल्याचा दावा विरोधक करत आहेत. या प्रकरणावरून मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या कथित व्हिडीओ प्रकरणाबाबत अद्याप तरी मंत्री झिरवाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघाचे आमदार आहेत. आता व्हायरल झालेला व्हिडीओ हा सात महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.