Vijay Wadettiwar : राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. कुठं जावं, काय निर्णय ध्यावा, अशा द्विधा मनस्थितीत ते सापडले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाला फायदा पोहोचवण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरु करण्याचं षडयंत्र भाजपानं रचलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. नांदेडमध्ये एपीबी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“शनिवारी ठाण्यात जो काही वाद झाला ते मर्यादेचं उल्लंघन होतं. मुळात राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. कुठं जावं, काय निर्णय घ्यावा, अशा द्विधा मनस्थितीत ते सापडले आहेत. अशा परिस्थितीत शिंदेंना फायदा पोहोचवण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरु करण्याचं षडयंत्र भाजपानं रचलं आहे. मतांचं विभाजन करण्याच्या हेतूने हा सगळा खेळ सुरू आहे”, अशी टीका विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणाला विरोध की पाठिंबा? अजित पवारांची रोखठोक भूमिका; मनोज जरांगेंच्या मागणीबाबत म्हणाले…
“राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटवण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मात्र, आज काल काहीही झालं तर शरद पवार यांचे नाव घेतलं जातं. मागच्या काही दिवसांतील मनोज जरांगे यांची विधानं बघितली, तर ती शरद पवार यांच्या विरोधातसुद्धा आहेत”, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
“राज ठाकरे म्हणतात, शरद पवार यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे का, पण जर तुम्ही लोकसभा निडणुकीच्या आधीची राज ठाकरे यांची विधानं बघितली, तर ते सुद्धा अशाच प्रकारे विधानं करून भाजपावर टीका करत होते. पण आज ते महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. त्यामुळे मी म्हटलं की राज ठाकरे सध्या गोंधळलेले नेते आहेत”, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
परमबीर सिंह यांच्या आरोपावर म्हणाले…
दरम्यान, यावेळी बोलताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत, त्या कोणतंही तथ्य नाही, परमबीर सिंह धादांत खोटं बोलत आहेत. ज्यावेळी अॅंटेलिया प्रकरण झालं, तेव्हाच त्यांना घरी पाठवायला हवं होतं. मात्र, तेव्हा सरकारची चूक झाली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपाची मदत घेतली. ते भाजपाच्या इशाऱ्यावर बोलतात, हे आता लपून राहिलेलं नाही.”
© IE Online Media Services (P) Ltd