मुंबई: नागपूर विधान भवनाच्या नुतनीकरणासाठी एक हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम रुपये खर्च केली जात आहे. विधानसभा सभागृहाची ४०० तर विधानपरिषद सभागृहाची १२० आसनक्षमता केली जात आहे. दोन वर्षांनी हे नुतनीकरण पूर्ण होणार आहे. वेगळा विर्दभ केल्यास इतकी आसनक्षमता लागणार नाही. भाजपने २०१४ मध्ये वेगळ्या विर्दभाचे आश्वासन दिले होते. वेगळा विर्दभ करायचा नव्हता तर आश्वासन का दिले. असा प्रश्न उपस्थित करुन भाजपने विर्दभीय जनतेला फसवले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर चर्चा करताना सरकारला प्रश्न विचारले. भाजपचे नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी छोटया छोटया राज्यांची संकल्पाना मांडली होती. छोटे राज्य म्हणजे विकासाला तारक अशी त्यांची विचारसरणी होती. भाजप २०१४ पासून वेगळया विर्दभाचे आश्वासन देत आहे. भाजपच्या नेत्यांची वेगळा विर्दभ देण्याची मानसिकता नाही. दोन मराठी भाषिक राज्य तयार झाली तर बिघडले कुठे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
एकीकडे नागपूर विधानसभेच्या नुतनीकरणासाठी हजार बाराशे कोटी खर्च करायचे, दुसरीकडे वेगळा विर्दभ करण्याची भाषा करायची अशी भाजपची भूमिका आहे. विर्दभातील मतदार संघाची पुर्नरचना झाली तर ६२ पेक्षा ८० आमदार होतील. राज्यातील आमदारांच्या संख्येसाठी नागपूरची पुर्नरचना केली जात आहे. राज्याचे राजकारण करीत असताना विर्दभाला नेहमीच उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवले जात आहे. वेगळा विर्दभ करायचा नाही तर नागपूर विधानसभा नुतनीकरणावर होणारा हजार बाराशे कोटीचा खर्च वाचला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विर्दभाबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
