चंद्रपूरमध्ये कोविड बेड मॅनेजमेंट पोर्टलचे विजय वड्डेटीवारांच्या हस्ते उद्घाटन

रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी होणार महत्वपूर्ण मदत

”करोनाचे हे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे पुढचे नियोजन करताना ऑक्सिजन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.” असे आवाहन चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज(शनिवार) केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्वीकारली. करोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रामुख्याने उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात करोना उपाययोजनांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व म्हणाले की, करोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका अविरत कार्य करत आहे त्यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे. कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ११ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, १९ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर १८ कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत आहे. १४०० बेडचे नियोजन पूर्ण झालेले असून त्यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्यात ५०० बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यास मान्यता मिळाली आहे. रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे या करिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी तसेच रुग्णांच्या आरोग्य सोयी सुविधेसाठी ८५० ग्रामपंचायतींना १ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, लवकरच महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून करोना संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवा, मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा. कोविड त्रिसुत्रीच्या आधारेच करोनावर मात करता येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टल या ॲपचे रीतसर उद्घाटन केले या माध्यमातून रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे.

याशिवाय, वन अकादमी येथे १०० ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व विहित वेळेत काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. स्टाफ नर्स सावी मानकर यांनी लस टोचून दिली. तसेच नागरिकांनी लस टोचून घ्यावी, लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही करोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vijay wadettiwar inaugurates covid bed management portal in chandrapur msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या