Vijay Wadettiwar On Ashok Kharat : नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून एसआयटीद्वारे आता त्याची पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे फोटो समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.

या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणावर बोलताना मोठा दावा केला आहे. ‘भोंदू अशोक खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आला तर मंत्रिमंडळातील दोन-तीन जणांची विकेट जाईल’, असं विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “या प्रकरणात लॅपटॉप वैगेरे सर्व जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तो पेनड्राईव्ह कुठे आहे? तो पेनड्राईव्ह पुढे आणायला हवा, मग सर्व समोर येईल. कोण-कोण या भोंदू अशोक खरातचे भक्त आहेत, कोणी-कोणी भोंदू अशोक खरातची सेवा केली हे सगळं समोर येईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

‘…तर दोन-तीन जणांची विकेट जाईल’ : वडेट्टीवार

“मी जबाबदारीने सांगतो की जर भोंदू अशोक खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आला तर मंत्रिमंडळातील दोन-तीन जणांची विकेट जाईल. त्यामुळे तो पेनड्राईव्ह बाहेर आणू शकणार नाहीत. हे प्रकरण दाबलं जाईल. मात्र, यातून त्यांच्या सोईचं जेवढं असेल तेवढंच प्रकरण समोर आणलं जाईल. मला वाटतं की या प्रकरणामध्ये पुरावा संपविण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर पण होऊ शकतो”, असं मोठं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

अशोक खरातच्या अटकेबाबत मुख्यमंत्र्यांची सभागृहात मोठी माहिती

अशोक खरात प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना महत्वाची माहिती सांगितली. फडणवीस म्हणाले की, “नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भात सगळी माहिती काढण्याचं काम सुरू आहे. हे जे प्रकरण घडलं, ते अतिशय गंभीर आहे. या अशोक खरातने दिशाभूल करून अनेक महिलांबरोबर दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाबाबत मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की या प्रकरणाची कारवाई पोलिसांनी ट्रॅप तयार करून केली. या घटनेत महिलांची फसवणूक झाली, पण त्या पुढे यायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांना योग्य धीर दिल्यानंतर त्यातील काही महिलांनी तक्रार दाखल केली. आणखी काही महिला तक्रार देतील. मी या ठिकाणी एवढंच सांगतो की या प्रकरणात कारवाई जरी आता झाली असली तरी या कारवाईची तयारी आधीपासून सुरू होती. अशोक खरातच्या अटकेच्या आधी म्हणजे १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातून आपण एका तक्रारीचा उपयोग करून अशोक खरातला बाहेर जाता येऊ नये, यासाठी एलओसी (लूक आउट सर्कुलर) देखील जारी केली होती”, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.