Vijay Wadettiwar On Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली असून एसआयटीची चौकशी सुरू आहे. याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे फोटो समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
अशोक खरात प्रकरणावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सविस्तर भाष्यही केलं. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या अशोक खरात प्रकरणावर बोलताना मोठं भाष्य केलं आहे. अशोक खरात प्रकरणात १०० नाही तर २०० व्हिडीओ असल्याचा दावा विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“अशोक खरातबरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे. खूप लोक त्यामध्ये आहेत. मी तर म्हणेन की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. महिला आयोगाच्या पदावर असलेल्या एका महिला नेत्याचे फोटोही आपण त्या अशोक खरात बरोबर पाहतो. हे फारच विदारक आहे. या भोंदूगिरीला खत पाणी घालण्यासाठी जबाबदार फक्त सरकार आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
“अशोक खरातच्या प्रकरणावर उद्या आम्ही सभागृहात बोलणार आहोत. कोण-कोण मोहरे यामध्ये अडकले आहेत? यांच्या हातात विकासाची दोरी दिली. पण हे मात्र अशा प्रकारे भोंदूबाबाबरोबर ज्योतिषाची दोरी ओढत आहेत. अशा प्रकारची भोंदूगिरी पोसण्यासाठी फक्त भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
“अशोक खरात प्रकरणात जवळपास २०० व्हिडीओ आहेत. त्यातील ९० व्हिडीओ हे आक्षेपार्ह आहेत अशी माहिती समजती आहे. यामध्ये अनेक मंत्री आहेत, अनेक आयएएस अधिकारी आहेत. या सगळ्यांची गच्छंती झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं भाष्य
अशोक खरात प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अशोक खरात प्रकरण गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारे भांडाफोड केला. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे एकदम महिला पुढे येत नाहीत. त्या पीडितांना धीर देऊन आम्ही महिलांना समोर आणत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होतं आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. कुणालाच आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला आहे तो विनाकारण आहे. विरोधी पक्षातले कोण-कोण जायचे खरातांकडे याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वाधिक पुरावे तर माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांचं काम पोलीस करत आहेत. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. पण कुणी भेटलं आहे अशा माणसावर कारवाई करायला लागलो तर मग तुम्हाला माहीत आहे कोण कोण कसं काय करायचं ते तुम्हाला म्हणजेच माध्यमांना माहीत आहे. या प्रकरणात राजकारण करु नये, हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
