Vijay Wadettiwar : अमरावतीत आज महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना, आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या विधानावरून आमदार रवी राणा आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज माध्यमांशी त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार? “सरकारी पैसा रवी राणांच्या कमाईचा आहे का? की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कमाईचा आहे? रवी राणा जे बोलले, ते सरकारच्या मनातलं बोलले आहे, हेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात आहे. सरकारने ही योजना केवळ मतं मिळवण्यासाठी जाहीर केली आहे. राज्यातील बहिणींना फसवण्याचं आणि त्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम या सरकारने केलं आहे”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. हेही वाचा - Vijay Wadettiwar : “राज ठाकरे हे गोंधळलेले नेते, ते सध्या…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका! “रवी राणा हा बेईमान माणूस” “रवी राणा हा बेईमान माणूस आहे. ते बहिणींना फसवण्याचं काम करत आहेत. त्यांना पैशांचं प्रलोभन दाखवून त्यांचे मत विकत घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इतकी बेईमान व्यक्ती मी राजकारणात पाहिली नाही. रवी राणांनी केलेलं विधान म्हणजे राज्यातल्या संपूर्ण महिलांचा अपमान आहे. सरकारने या महिलांची माफी मागितली पाहिजे. आणि लाडकी बहीण योजना आम्ही मतांसाठी आणली होती, याची कबुली दिली पाहिजे”, असेही ते म्हणाले. रवी राणांनी नेमकं काय म्हटलं होतं? “सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. रवी राणांच्या या विधानानंतर उपस्थित महिलांमध्ये जोरदार हशाही पिकल्याचं बघायला मिळालं.