Vijay Wadettiwar on Maharashtra MLC Election : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष) हे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. तर महायुतीचे पाचही उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, "क्रॉस व्होटिंग करणाऱ्या गद्दार आमदारांना आम्ही शोधून काढलं असून यासंदर्भातील अहवाल आम्ही दिल्लीतील आमच्या पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. या गद्दारांवर लवकरच कारवाई केली जाईल." विजय वडेट्टीवार म्हणाले, "विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदार आमच्याबरोबर नव्हते ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही काहींनी गद्दारी केली होती. यावेळी मात्र आम्ही त्या सर्वांवर कारवाई करणार आहोत. गद्दारांना आम्ही शोधून काढलं आहे. कोणी आम्हाला मतं दिली, कोणी दिली नाहीत, कोणी पक्षाशी गद्दारी केली, या लोकांची आमच्याकडे यादी आहे. या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी (नाना पटोले) या आमदारांबाबतचा एक अहवाल दिल्लीला आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील." "मुंबई-नांदेडच्या काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं" विरोधी पक्षनेते म्हणाले, "या गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील काहीजण आहेत, मुंबईतील काहीजण आहेत. आम्ही त्यांची नावं शोधून काढली आहेत. त्यांची नावं आत्ता उघड करता येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वांना माहिती मिळेल." विजय वडेट्टीवार म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करताना सर्व आमदारांना एक फॉर्म्युला दिला होता, त्यानुसार त्यांनी मतदान करायचं होतं. मात्र काही आमदारांनी पक्षाचा आदेश पाळलेला नाही आणि आम्ही त्यांची नावे शोधून काढण्यात यशस्वी ठरलो आहोत. या गद्दारांना नक्कीच शिक्षा होईल. एका घरात राहायचं आणि दुसऱ्या घरातली थाळी उचलायची हा प्रकार आता थांबला पाहिजे. यासाठी पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल. हे ही वाचा >> Sanjay Raut : “शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळणं हाच मोठा घोटाळा”, संजय राऊतांचा टोला सत्ताधाऱ्यांनी राज्याची तिजोरी लुटून मिळवलेले पैसे निवडणुकीसाठी वापरले : वडेट्टीवार वडेट्टीवार म्हणाले, भाजपाने आणि सत्तेतील खोकेबाज लोकांनी पैशाच्या बळावर काही मतं फोडली. काही मतं राजकीय दबाव टाकून फोडली. आमच्या काही आमदारांनी पक्षाचा आदेश न जुमानता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान केलं आणि ही गद्दारी आहे. या गद्दारांवर लवकरच कारवाई होईल. विधान परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेतील लोकांनी पैशांचा अमाप वापर केला. एकेका मतासाठी चार-चार कोटी रुपये खर्च केले. राज्याची तिजोरी लुटून या लोकांनी जे पैसे कमावले तेच पैसे निवडणुकीत वापरले, मतांची खरेदी केली आणि त्यांचा उमेदवार निवडून आणला.