मराठा आरक्षणाची मागणी करत १६ दिवस बेमुदत अन्नत्याग उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मांडलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. जरांगे यांच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारने काढावी, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु, ते देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. या मागणीसाठी अनेक ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आंदोलन करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील अशीच मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर मागणी केली आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून जातप्रमाणपत्र (कुणबी) दिलं जावं. जरांगे यांची ही मागणी संविधानिक नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच असेल तर, त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. त्याला आमचा कोणाचाच विरोध नाही. परंतु, ओबीसीतून आरक्षण देण्याला आम्ही महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. हे ही वाचा >> बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले… काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिल्यास त्याला आमचा विरोध नाही, अशा आरक्षणाला विरोध असण्याचं कारणच नाही. सध्या देशात आणि राज्यात बहुमतातलं सरकार आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. आमचा त्या निर्णयाला पाठिंबा असेल.