बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, धीरेंद्र शास्त्री यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. “हा महाराष्ट्र धर्माला नख लावण्याचा कट आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नेमका वाद काय?
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत भाष्य करताना वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांसारख्या बलाढ्य सत्तांना नमवून स्वराज्य उभे केले. हा जाज्वल्य इतिहास संपूर्ण जगाला माहित असताना, एका सार्वजनिक मंचावरून महाराजांच्या पराक्रमाचा अवमान होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.’
भाजप आणि संघावर निशाणा
वडेट्टीवार यांनी केवळ धीरेंद्र शास्त्रींवरच नव्हे, तर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिग्गज नेत्यांवरही टीका केली. “ज्या वेळी हे विधान केले गेले, तेव्हा मंचावर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आरएसएसचे सरसंघचालक उपस्थित होते. यापैकी एकानेही त्या भोंदू बाबाला रोखले का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा सर्व प्रकार म्हणजे भाजप आणि संघाचा जाणीवपूर्वक केलेला कट असून, शिवरायांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा हा ‘मनुवादी’ प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संजय गायकवाड यांना जाहीर आव्हान
या वादात वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनाही लक्ष केले आहे. आपल्या रोखठोक शैलीत ते म्हणाले, “स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे संजय गायकवाड आता कुठे आहेत? ते धीरेंद्र शास्त्रीला ‘ढगात’ कधी पोहोचवणार? या भोंदूला दणकून शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल. आहे का तुमच्यात तशी हिंमत?”
अटकेची मागणी
विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, धीरेंद्र शास्त्री याला तात्काळ अटक करण्यात यावी. महाराष्ट्र धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या टीकेनंतर सत्ताधारी पक्ष किंवा संजय गायकवाड काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
