मुंबई : एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रस्ताव एकत्र करुन चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अधिवेशनात असे कधीच घडलेले नाही. अधिवेशन काळात विरोधकांचा चर्चा करणे हा अधिकार आहे. चार प्रस्ताव एकत्र करण्याचा पुर्नविचार करा. सत्ताधारी पक्षाने अधिवेशनाचे वाटोळे केले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेचे तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी नियम २९३ अन्वेय सादर करण्यात आलेले चार प्रस्तावांवर एकत्र चर्चा करण्याचे निर्देश दिले. त्यावर वडेट्टीवार यांनी टीका केली. एकाच वेळी नऊ दहा लक्षवेधी कशासाठी घेता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकाच वेळी चार पाच प्रस्ताव एकत्र करुन चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सत्ताधारी पक्ष अशाच प्रकारे सभागृहाचे कामकाज करणार असेल तर आम्ही विरोधक बाहेर जातो.
आता अधिवेशन संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तेव्हा विरोधकांना नियम २९३ वर चर्चा करायची आहे. मंत्र्यांना त्याची उत्तरे दयावी लागतील. एकत्र चर्चा करायची असेल तर तुम्हाला वाटेल तसे कामकाज करा, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी प्रस्तावाच्या एकत्र चर्चेवर नाराजी व्यक्त केली.
